पाकिस्तानच्याइम्रान खान सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप आता वाढू लागला आहे. अनेक सभांद्वारे इम्रान सरकराविरोधात लोकांना एकत्र केले जात आहे. या सभांमुळे पाकिस्तानातील वातावरण तापू लागले असून आता सिंध प्रांताचे पोलीस आणि पाकिस्तानी सैन्य आमनेसामने आले आहेत. माजी पंतप्रधान नवाज़ शरीफ यांच्या जावयाला अटक करण्यात आली होती. यानंतर त्याला सोडूनही देण्यात आले. आता या प्रकरणामुळे सिंध पोलिसांच्या विरोधात सैन्याने चौकशी सुरु केली आहे.
कॅप्टन मोहम्मद सफदर हे शरीफ यांचे जावई आहेत. त्यांच्या अटकेवरून पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी मंगळवारी चौकशीचे आदेश दिले. सफदर यांची अटक का आणि कोणत्या परिस्थितीत झाली याची चौकशी केली जाणार आहे. शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांनी आरोप लावला होता की, त्यांच्या हॉटेलच्या खोलीमध्ये तोडफोड करण्यात आली आणि सफदरला घेऊन गेले. यानंतर पाकिस्तानमध्ये गोंधळ उडाला होता. आता सैन्य याची चौकशी करणार आहे.
या प्रकरणानंतर पाकिस्तानमध्ये बंड उफाळून आले आहे. सिंध पोलिसांविरूद्ध आयएसआय असा सामना रंगला आहे. सिंध पोलिसांनुसार सफदर यांना पोलिसांना कोणतीही कल्पना न देता अटक करण्यात आली. जेव्हा ही अटक झाली तेव्हा सिंध पोलीस प्रमुखांना एका ठिकाणी घेरण्यात आले होते. यानंतर लगेचच पाकिस्तानी सैन्याने सफदर यांना अटक केली होती.
यानंतर नाराज झालेल्या सिंध पोलिसांच्या आयजींनी सुटीवर जाण्याची घोषणा केली. यामुळे सिंध पोलिसांचे हजारो जवानही सुटीवर गेले आहेत. या साऱ्या प्रकारामुळे प्रांतामध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. तसेच लोकही रस्त्यावर उतरले आहेत. या दबावात य़ेऊन सैन्याने शेवटी सफदर यांच्या अटकेच्या चौकशीचे आदेश दिले.
इम्रान खानला देशहितासाठी जिंकवले; पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची कबुली
सिंध प्रांतातील सरकारने पोलिसांना सुटीवरून पुन्हा कामावर येण्याची विनंती केली आहे. यानंतर अधिकाऱ्यांनी सुटी मागे घेतली. पाकिस्तानमध्ये इम्रान सरकारविरोधात पोलिसांनी बंड करण्यामुळे आता सरकारचा विरोध तीव्र होऊ लागला आहे. इम्रान सरकारविरोधात विरोधी पक्ष सलग सभा घेत आहे. कराचीपासून सर्वत्र या सभा घेतल्या जात आहेत.