लंडन : कोरोना लॉकडाऊनमुळे ब्रिटनमध्ये एप्रिल ते जून या तिमाहीत अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून, देशात अधिकृतरीत्या मंदीची स्थिती निर्माण झाली आहे.या वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत अर्थव्यवस्था २०.४ टक्क्यांनी घसरली आहे. दुकाने बंद राहिल्यामुळे घरगुती खर्च घसरला आहे. त्यामुळे कारखाना उत्पादन आणि बांधकामात मोठी घसरण झाली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून ब्रिटनमध्ये २००९ नंतर पहिल्यांदाच ‘तांत्रिक मंदी’ (टेक्निकल रेसेशन) आली आहे. सलग दोन तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनात घसरण झाल्यास ‘तांत्रिक मंदी’ आल्याचे मानले जाते.‘आॅफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स’ने (ओएनएस) म्हटले की, सरकारने निर्बंध उठविण्यास सुरुवात केल्यानंतर जूनमध्ये अर्थव्यवस्था सुधारली आहे. मासिक आधारावर अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर ८.७ टक्क्यांवर आला. मेमध्ये तो १.८ टक्क्यांवर होता.राष्ट्रीय सांख्यिकी विभागाचे उपप्रमुख जोनाथन अॅथो यांनी सांगितले की, सुधारणा दिसत असली तरी फेब्रुवारीच्या तुलनेत जूनमध्ये जीडीपी एकषष्ठांशच आहे. दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरन्ट्स, शाळा आणि कार दुरुस्ती केंद्रे बंद राहिल्याने उत्पादन ठप्प झाले आहे. अर्थव्यवस्थेत चारपंचमांश वाटा असलेल्या सेवा क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. कार उत्पादन १९५४ नंतर नीचांकी पातळीवर घसरले आहे.कपडे, पुस्तके आणि इतर बिगर-जीवनावश्यक वस्तूंची दुकाने १५ जूनपासून पुन्हा सुरू झाली आहेत.
ब्रिटनमध्ये ११ वर्षांनंतर प्रथमच मंदीची स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 1:50 AM