शांघाय : वस्तूंच्या विक्रीत प्रचंड नरमाई आल्यामुळे चीनमध्ये मंदीची चाहूल जाणवू लागली आहे. विक्री मंदावल्यामुळे कंपन्यांना उत्पादनात कपात करावी लागली आहे. इतकेच नव्हे, तर मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातही केली जात आहे. चीनची बलाढ्य तंत्रज्ञान कंपनी अलीबाबाने सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे.
जूनच्या तिमाहीत अलीबाबाच्या हांग्जो स्थित प्रकल्पातून ९,२४१ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. जूनला संपलेल्या सहामाहीत कंपनीने १३,६१६ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. २०१६ नंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांत पहिल्यांदाच घसरण झाली. सरकारी दबावामुळे चीनचे अब्जाधीश जॅक मा हे ‘अँट समूहा’वरील आपले नियंत्रण सोडण्याची योजना बनवित आहे.
५०% उत्पन्नामध्ये झाली घट
जूनच्या तिमाहीत अलीबाबाच्या उत्पन्नात ५०% म्हणजेच २२.७४ अब्ज युआन (३.४ अब्ज डॉलर) घसरण झाली आहे. गेल्यावर्षी समान अवधीत कंपनीचे उत्पन्न ४५.१४ अब्ज युआन होते. चीनमधील व्यावसायिक घडामाेडींत मोठी घट झाली असून, त्याचा फटका बसत आहे.
अनेक तंत्रज्ञान कंपन्यांत नोकर कपात
अनेक तंत्रज्ञान कंपन्यांनी नोकर कपात केली आहे. सिलिकॉन व्हॅलीतील कंपन्यांनी सुमारे ३२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. या कंपन्यांत ट्विटर, टिकटॉक, शॉपिफाय, नेटफ्लिक्स आणि कॉइनबेस आदींचा समावेश आहे. ट्विटरने ३० टक्के कर्मचारी कमी केले आहेत.