संयुक्त राष्ट्रे : पाकिस्तानने बळकावलेला भूभाग भारताला परत करावा, मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यातील दहशतवाद्यांवर तांत्रिक मुद्द्यांचा बाऊ न करता कडक कारवाई करावी, अशी मागणी करत भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वरुल हक काकर यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत काश्मीरचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला चोख प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तानवर कडक टीका केली.भारताचे संयुक्त राष्ट्रांतील प्रतिनिधी पेटल गेहलोत यांनी आमसभेत सांगितले की, जगाने बंदी घातलेल्या अनेक संघटना व दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय दिला आहे.
‘जम्मू-काश्मीर, लडाख भारताचेच’ गेहलोत म्हणाल्या की, जम्मू-काश्मीर व लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे. भारताच्या देशांतर्गत बाबींवर भाष्य करण्याचा पाकिस्तानला कोणताही अधिकार नाही. जगामध्ये मानवी हक्कांचे सर्वाधिक उल्लंघन करणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश होतो. तेथील अल्पसंख्याक व महिलांवर खूप अत्याचार होतात.