कॅनडामध्ये उष्णतेचा कहर (Heat wave in Canada) पाहायला मिळत आहे. सलग तिसऱ्या दिवशी तब्बल 49 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे उन्हामुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 134 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रॉयल कनॅडियन माउंटेड पोलीस आणि सिटी पोलीस डिपार्टमेंटच्यावतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारनंतर वँकूवरमध्ये कमीत कमी 134 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये वृद्धांची संख्या अधिक आहे.
वँकूवर पोलीस डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारनंतर अचानक 65 लोकांचा मृत्यू झाला. मृतांपैकी अनेकांची प्रकृती बरी नव्हती. मात्र, वाढलेल्या तापमानामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचं म्हटलं जात आहे. वँकूवरच्या पश्चिमेपासून 250 किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रिटिश कोलंबियाच्या लिटनमध्ये सलग तिसऱ्या दिवशी 49.5 डिग्री तापमानाची नोंद झाली असून तो आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. पोलीस अधिकारी स्टीव एडिशन यांनी वँकूवरमध्ये अशी गरमी कधीच नव्हती. अचानक खूप लोकांचा मृत्यू होत आहे असं म्हटलं आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी देखील लोकांचा मृत्यू होत असल्याचं मान्य केलं आहे. मात्र अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही. वातावरणातील बदलांमुळे हवेतील उष्णतेत वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे अमेरिकेतील पोर्टलँडमधील लोकांनाही भीषण उन्हाचा सामना करावा लागत आहे. गेल्या शनिवारी तापमानाने याआधीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. अधिकाऱ्यांन लोकांना आतापर्यंतचा इतिहासातील सर्वांत भीषण गरमीचा लोकांना सामना करावा लागत असल्याचं म्हटलं आहे. तसेच पोर्टेबल एअर कंडीशनर आणि पंख्यांची मागणी वाढल्याने आता त्याची मोठी कमतरता जाणवू लागली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.