श्रीलंकेतील वाढत्या महागाईमुळे देशासमोर उपासमारीचं संकट निर्माण झालं आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या (WFP) एका नव्या रिपोर्टनुसार, 62 लाखांहून अधिक लोक उपासमारीच्या दिशेने जात आहेत. रिपोर्टनुसार, श्रीलंकेतील प्रत्येक 10 घरांपैकी तीन घरांमध्ये उपासमारीचं संकट अधिक गडद झालं आहे. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, या लोकांना त्यांच्या पुढील जेवणाची व्यवस्था कशी केली जाईल हे देखील माहीत नाही.
अन्नपदार्थ आवश्यकतेपेक्षा महाग होत असल्याने 61 टक्के कुटुंबे आपला खर्च कमी करण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना कमी अन्न घेऊन काम करावे लागते. तसेच त्यांच्यामध्ये पोषक तत्वांची कमतरता निर्माण होण्याचाही धोका असतो. वर्ल्ड फूड प्रोग्रामने आपल्या रिपोर्टमध्ये गर्भवती महिलांना पोषणाच्या कमतरतेचा सर्वाधिक त्रास होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली आहे. जन्माला आलेल्या बालकांना अनेक आजारांनी घेरले जाऊ शकते असंही म्हटलं आहे.
डब्ल्यूएफपी आशिया आणि पॅसिफिकच्या उप प्रादेशिक संचालक अँथिया वेब यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्भवती मातांनी दररोज पौष्टिक आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे, परंतु गरीब लोकांना मूलभूत पुरवठा करणे कठीण होत आहे. अँथिया वेब यांनी एका स्थानिक टेलिव्हिजन स्टेशनला सांगितले की, महागाईमुळे जेवण वगळून, गर्भवती महिला स्वतःचे आणि त्यांच्या बाळाचे आरोग्य धोक्यात आणत आहेत.
57 टक्क्यांवर पोहोचला महागाईचा दर
अन्न संकटाचा सामना करण्यासाठी, काही गरीब भागातील गर्भवती महिलांना, स्थानिक सरकारने प्रदान केलेल्या प्रसूतीपूर्व काळजी योजनेसह WFP मासिक फूड व्हाउचरचे वितरण करत आहे, ज्याची किंमत 40 डॉलर आहे. श्रीलंकेतील आर्थिक संकटाच्या काळात महागाईचा दर 57 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे 5 पैकी 2 कुटुंबे पोषण आहारापासून वंचित राहिली आहेत. कच्च्या तेलाच्या समस्येमुळे सरकारने सर्व शाळा, सरकारी कार्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवली आहेत. त्यामुळे देशातील तरुण पिढीचे भवितव्यही टांगणीला लागले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.