ऑनलाइन लोकमत -
ब्रुसेल्स (बेल्जिअम), दि. 11 - सौदी अरेबियात रमझानच्या निमित्ताने झालेल्या दहशतवाही हल्ला ही चेतावणी असून लष्कर-ए-तोयबाने आपले हात पसरण्यास सुरुवात केली आहे. मदिनामध्ये झालेला दहशतवादी हल्ल्याचा मागे लष्कर-ए-तोयबा आणि हाफिज सईदने सुरु केलेली स्वयंसेवी संस्थाफलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशनचा हात असल्याची शक्यता युरोपिअन संसद उपाध्यक्ष रिझार्ड झारनेक यांनी व्यक्त केली आहे. रिझार्ड झारनेक यांनी लिहिलेल्या ' वेक अप कॉल टू अँटी - टेररिझम अय्यतोल्लाज' लेखाच्या माध्यमातून ही शंका व्यक्त केली आहे.
'इसीसने मध्य पुर्व देशांमध्ये दहशतवादी कारवाया करण्यास सुरुवात केल्यापासून पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा आणि फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशननेदेखील आपलं जाळ पसरवण्यास सुरुवात केली आहे. लष्कर-ए-तोयबा आणि फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशनच्या हालचाली भारताशी निगडीत असल्याचा समज असल्याने त्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं. पण मदिना येथे झालेल्या हल्ल्यामुळे हे मत बदललं असल्याचं', रिझार्ड झारनेक यांनी लेखात नमूद केलं आहे.
मदिना येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्याप्रकरणी 12 पाकिस्तानी नागरिकांसह 19 जणांना अटक करण्यात आल्याचे सौदी अरेबियाच्या सरकारने जाहीर केले होते. मदिना येथे झालेल्या हल्ल्यात चार जण ठार झाले होते. तर कातिफमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये तीन जण ठार झाले होते. जेद्दाह मध्ये झालेला हल्ला अब्दुल्ला कलझर खान या पाकिस्तानी व्यक्तिने केल्याचे तपासात आढळले आहे. ड्रायव्हर असलेला अब्दुल्ला गेली 12 वर्षे सौदीमध्ये आहे. अब्दुल्ला कलझर खानच्या अटकेमुळे फलाह-ए-इन्सानियत कशाप्रकारे पाकिस्तानी नागरिकांना कट्टरवादी करत आहे समोर आल्याचं रिझार्ड झारनेक यांनी म्हटलं आहे.
'फलाह-ए-इन्सानियत ही हाफिज सईदने सुरु केलेली चॅरिटेबल संस्था आहे. फलाह-ए-इन्सानियत तरुणांना भरती करण्याचं काम करत असून त्यांना कट्टरवादी बनवत आहे. समाजकार्य करण्याच्या नावाने दहशतवाद्यांची भरती करण्याचं काम केलं जातून यामध्ये फलाह-ए-इन्सानियतची मदत घेतली जात आहे. लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानमधील इतर दहशतवादी संघटना ज्यांचा शरिया कायद्यावर विश्वास आहे ते दहशतवाद्यांची भरती करण्यासाठी जास्त काम करत आहेत. हा एक धोका असून याच्याशी लढा दिला पाहिजे, असंही रिझार्ड झारनेक यांनी लिहिलं आहे.