डाकार- संपुर्ण जगाचा थरकाप उडवणाऱ्या इबोलाविरोधात लढण्यासाठी मिळालेल्या लक्षावधी डॉलर्सच्या निधीमध्ये आपल्याच कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याची कबूली रेडक्रॉसने दिली आहे. रेडक्रॉसने केलेल्या अंतर्गत तपासामध्ये या निधीचा भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सिएरा लिओनमध्ये 21 लाख डॉलर्स रुपये संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक बॅंक अधिकाऱ्यांशी संगनमताने स्वतःच्या खिशात घातल्याचे दिसून आले तर गिनीमध्ये खोट्या आणि मोठ्या रकमेच्या बिलांच्या पावत्या दाखवून 10 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.इबोलावर नियंत्रण आणण्यासाठी रेडक्रॉसने मागवलेल्या साहित्यामध्ये लायबेरियामध्येही 26 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे सांगण्यात येते. पश्चिम आफ्रिकेमध्ये वेगाने पसरणाऱ्या भयावह अशा इबोलावर नियंत्रण आणण्यासाठी रेडक्रॉसने लक्षावधी डॉलर्सचा निधी जमा केला होता. हा निधी लोकांवर उपचार करण्यासाठी, उपचार साहित्य तसेच पुनर्वसन अशा बाबींसाठी वापरण्यात येणार होता. पण आता त्यात मोठा अपहार झाल्याचे लक्षात येताच सर्व जगाचे लक्ष इबोलाने नव्याने नव्या रुपात वेधून घेतले आहे.
रेडक्रॉसने लोकांवर उपचार, मृतदेहांची विल्हेवाट, लोकांना इबोलाविरोधात लढण्यासाठी शिक्षण देणे यासाठी 6 हजार कर्मचारी नेमले होते तर साथीच्या एकूण काळामध्ये 1.24 कोटी डॉलर्सच्या निधीची उलाढाल रेडक्रॉसतर्फे झाली होती. आता भ्रष्टाचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर रेडक्रॉस कशाप्रकारे कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.