कोलंबो : श्रीलंकेत सुमारे तीन दशके चाललेल्या यादवीत बेपत्ता झालेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी सरकार रेडक्रॉसची मदत घेणार आहे. श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्रालयाने ही माहिती दिली. श्रीलंकेत तामिळ फुटीरवाद्यांच्या संघर्षामुळे तीन दशके यादवी चालली. या काळात मोठ्या प्रमाणावर लोक बेपत्ता झाले. यादवी संपुष्टात आल्यानंतर २०१३ पासून सरकारकडे २० हजार लोक बेपत्ता झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत.या पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्रालयाने आंतराष्ट्रीय रेडक्रॉस समितीच्या प्रतिनिधी मंडळाशी चर्चा केली त्यातच हा निर्णय घेण्यात आला. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी सरकारने उचललेल्या अनेक पावलांचा या बैठकीत उल्लेख करण्यात आला. त्यात बेपत्ता असलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी बेपत्ता प्रमाणपत्रे देण्याचाही प्रस्ताव आहे.बेपत्ता प्रमाणपत्रे देण्याच्या प्रस्तावावर संसदेत बोलताना गृहमंत्री वज्र अबेवर्धन म्हणाले की, या प्रमाणपत्रांमुळे बेपत्ता लोकांचा शोध घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे प्रमाणपत्र दिले तरीही तपास चालूच राहील. दरम्यान, २०१३ पासून आतापर्यंत बेपत्ता लोकांबाबत २० हजार तक्रारी आल्याचे आणि या लोकांचा शोध घेण्याची विनंती करण्यात आल्याचे एका सरकारी पत्रकात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)