वॉशिंग्टन : प्राथमिक शाळांमध्ये योगाचे शिक्षण देणे म्हणजे हिंदू धर्माचा प्रचार करणे होत नाही व त्याने विद्यार्थ्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचाही भंग होत नाही, असा निकाल देत कॅलिफोर्नियातील एका अपिली न्यायालयाने स्थानिक शाळांमध्ये योगाचे शिक्षण सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे.एका दाम्पत्याने आपल्या दोन पाल्यांच्या वतीने शाळांमध्ये योग शिकविण्यास आव्हान दिले होते. योगाभ्यास हे मूलत: (हिंदू) आध्यात्मिक शिक्षण असल्याने ते धार्मिक शिक्षण आहे व म्हणूनच ते घटनाबाह्य आहे, असा या पालकांचा दावा होता. आधी जिल्हा न्यायालयाने हा दावा फेटाळून लावल्यानंतर अपील केले होते. जिल्हा अपिली न्यायालयाच्या ३ न्यायाधीशांंनी हे अपीलही अमान्य केले. अपिली न्यायालयाने म्हटले की, शाळांमध्ये दिले जाणारे योग शिक्षण हे धर्मनिरपेक्ष आहे व त्याचा परिणाम कोणत्याही एका धर्माचा प्रसार करण्यात अथवा इतर धर्मास अटकाव करण्यासारखा होत नाही, तसेच हा अभ्यासक्रम राबवून शाळा प्रशासन धार्मिक बाबींमध्ये नको तेवढे गुरफटले आहे, असेही म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने जाहीर केले. या दाव्यातील फिर्यादी दाम्पत्याचे वकील डीन ब्रॉयल्स म्हणाले की, अपिली न्यायालयाच्या या निकालाने मी व माझे अशील नाराज झालो असून पुढे काय करायचे याचा आम्ही विचार करीत आहोत. जिल्हा शिक्षण अधीक्षक टीम बेअर्ड म्हणाले की, शाळा प्रशासनाला अनुकूल निकालाचीच अपेक्षा होती व तसाच निकाल झाला याचा आम्हाला आनंद आहे. योगाभ्यास करणारी व्यक्ती हिंदू होते, हे म्हणणे म्हणजे कमालीची अतिशयोक्ती आहे, असेही ते म्हणाले (वृत्तसंस्था)सॅन दियागोमधील एनसिनिटास युनियन एलिमेंट्री स्कूल डिस्ट्रिक्टमध्ये वर्ष २०१२ पासून बालवाडी ते सहाव्या इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आरोग्य शिक्षणाचा एक भाग म्हणून योग शिक्षण दिले जात आहे. एनसिनिटास येथील सोनिमा फौंडेशनने शारीरिक शिक्षणात योगाचा समावेश करण्यासाठी दोन दशलक्ष डॉलरची देणगी दिली, त्यातून हे शिक्षण सुरू झाले. यात विद्यार्थ्यांना दर आठवड्याला प्रत्येकी ३० मिनिटांचे किमान दोन तास घेऊन योगशिक्षण दिले जाते.