ऑनलाइन लोकमत -
ब्रुसेल्स, दि. २२ - बेल्जियममधील ब्रुसेल्स येथे दहशतवादी हल्ला करुन निष्पापांचे बळी घेणा-या दहशतवाद्यांचे सीसीटीव्ही जारी करण्यात आले आहे. दहशतवाद्याच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणात तपास सुरु आहे. ब्रुसेल्स येथे विमानतळावर आणि त्यापाठोपाठ मेट्रो स्टेशनवर मंगळवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात ३४ ठार तर २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.इसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
बेल्जियमने अधिकृतपणे जारी केलेल्या या सीसीटीव्हीमध्ये संशयित तीन आत्मघाती हल्लेखोर टर्मिनलमधूल बाहेर पडताना दिसत आहेत. यामधील दोन हल्लेखोरांनी स्फोट घडवून आत्महत्या केली असून एका हल्लेखोराकडील बॉम्ब न फुटल्याने त्याचा कट फसला. फोटोमधील हॅट घातलेला हल्लेखोर जिवंत असल्याचा संशय आहे. या हल्लेखोराच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. सरकारी अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार जिवंत हल्लेखोराला विमानतळ बिल्डिंगमधून पळून जाताना पाहिलं आहे.
विमानतळावर झालेले दोन स्फोट आत्मघाती हल्ले होते. तसंच एक जिवंत बॉम्बदेखील विमानतळावर सापडला असल्याची माहिती बेल्जियमधील उच्च अधिका-याने दिली आहे.
स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास जेवेन्तम विमानतळाच्या मुख्य कक्षात दोन स्फोट झाले. त्यानंतर काही वेळातच युरोपीय संघाच्या मुख्य इमारतीजवळ मालबिक मेट्रो स्टेशनवर तिसरा स्फोट झाला. कार्यालयीन वेळ असल्याने मेट्रो स्टेशनवर मोठी गर्दी होती. तर विमानतळावरही चेक इन करण्यासाठी हजारो प्रवासी प्रतीक्षेत होते. अग्निशमन विभागाच्या प्रवक्त्यांनी पॅरिसमध्ये नोव्हेंबर महिन्यात १३० जणांचे बळी घेणाऱ्या हल्ल्यानंतर चार महिन्यांनी यातील प्रमुख संशयित सालेह अब्देसलाम याला शुक्रवारी नाट्यमयरीत्या अटक झाली. या भीषण बॉम्बस्फोटात ३४ ठार तर २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.