ऑनलाइन लोकमत
बिजींग, दि. 19 - चीनमधल्या कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्यांना पक्षातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी आपला धर्म सोडावा लागणार आहे. चीनमधले मार्क्सवादी नास्तिक असून ईश्वराला मानत नाहीत. धर्म सोडा किंवा शिक्षा भोगा असे चीनमधल्या धार्मिक बाबींचे नियमन करणा-या सरकारी विभागाने सांगितले आहे. ग्लोबल टाइम्समध्ये यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
चायनीस कम्युनिस्ट पार्टी ईश्वराला मानत नाही. पण चीनच्या संविधानाने धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. पक्ष सदस्यांनी कुठल्याही धर्माचे पालन करु नये असे वँग झ्युओअॅन यांनी म्हटले आहे. ते धार्मिक विषयांवरील प्रशासकीय समितीचे संचालक आहेत.
वँग यांचे विचार पक्षाच्या नियमांना धरुन आहेत. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या धोरणानुसार त्यांच्या 9 कोटी सदस्यांना कुठल्याही धर्मावर विश्वास ठेवण्यास मनाई आहे. धार्मिक संघटनेशी संबंधित असलेल्या सदस्यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी अनेकदा करण्यात आली आहे. वँग यांनी त्याच नियमांची आठवण करुन दिली आहे.
आणखी वाचा
चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्यांना सांस्कृतिक विविधता किंवा अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या नावाखाली स्वत:ला धार्मिक कार्यात गुंतवून घेता येत नाही. धार्मिक विश्वासामुळे पक्षाची मुल्य आणि एकता भंग होते असे एका सरकारी अधिका-याने सांगितले. सध्या चीनचे भारत आणि दक्षिण चीनच्या समुद्राच्या मालकी हक्कावरुन शेजारी देशांबरोबर वाद सुरु आहेत. शेजारी देशांचा आवाज दडपून टाकण्यासाठी चीन अती आक्रमकता दाखवित आहे. सिक्कीममध्ये चीनच्या या धमक्यांना कोणतीही भीख न घालता भारतानेही त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.
डोकलाम वाद चिघळल्यास होईल भीषण युद्ध
डोकलाममधील चीनच्या विस्तारवादी धोरणास भारतीय लष्कराने आडकाठी केल्याने चवताळलेल्या चीनकडून देण्यात येत असलेल्या धमक्यांची मालिका सुरूच आहे. आता डोकलाममधील वाद चिघळल्यास भीषण युद्ध होईल, अशी धमकी चीनी प्रसारमाध्यमांनी भारताला दिली आहे. डोकलाममध्ये भारताकडून कडवा प्रतिकार होईल अशी अपेक्षा चीनला नव्हती. मात्र महिनाभर वादविवाद चालल्यानंतरही भारत एक पाऊलही मागे न हटल्याने ड्रॅगनची आग झाली आहे.