क्वालालंपूर - हिंदी महासागराच्या दुर्गम बेटापर्यंत लोटले गेलेले अवशेष मलेशियाच्या बोर्इंग ७७७ या बेपत्ता विमानाचेच असण्याची शक्यता आहे, असे मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी म्हटले आहे. एमएच ३७० हे प्रवासी विमान वर्षभरापूर्वी २३९ प्रवाशांसह बेपत्ता झाले होते. त्यात पाच भारतीय प्रवासीही होते. फ्रान्समधील ला रियुनियन हे बेट आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळ येते. या बेटावर बुधवारी विमानाच्या पंखाचा दोन मीटर लांबीचा तुकडा (फ्लॅपरॉन) सापडला आहे. हा तुकडा मलेशिया एअरलाईन्सच्या दुर्दैवी बोर्इंग ७७७ चाच असावा असे मानले जात आहे. ८ मार्च २०१४ रोजी २३९ प्रवाशांसह हे विमान बेपत्ता झाले होते. सापडलेले अवशेष बोर्इंग ७७७ या बेपत्ता विमानाचेच असावेत; पण ते नक्की याच विमानाचे असल्याचे ठरविण्यासाठी तपास करण्याची गरज आहे, असे नजीब यांनी फेसबुक पेजवर लिहिले आहे. (वृत्तसंस्था)गूढ उकलणार...? मलेशियाचे एमएच ३७० विमान गेल्या वर्षी ८ मार्च रोजी समुद्रात बेपत्ता झाले होते. त्याचा अजून नेमका शोध लागलेला नाही. परंतु ला रियुनियन येथे बुधवारी विमानाचा तुकडा आढळला. याच ठिकाणी एक सूटकेस आढळली. गुरुवारी जॉनी बिग्यू हा किनारा स्वच्छ करणाऱ्या संघटनेच्या सदस्याने ती दाखविली. हा तुकडा आणि सूटकेस या विमानाशी संबंधित आहे का याचा शोध घेतला जाईल.विमानाच्या पंखाचा दोन मीटर लांबीचा तुकडा मिळाला आहे. आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवर मिळालेला हा अवशेष बोर्इंग ७७७ या मलेशियन विमानाचा असण्याची दाट शक्यता आहे, असे मलेशियाचे उपवाहतूकमंत्री अब्दुल अझीझ काप्रावी म्हणाले. फ्रान्स हवाई सेवेचे अपघात संशोधन पथक अवशेषांची तपासणी करीत आहे. चौकशी पथकाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोर्इंग ७७७ या विमानाच्या पंख्याचा एक भाग सापडला आहे. हा भाग विमानाच्या फोटोत पाहिला असल्याचे निरीक्षकांचे मत आहे. हे निरीक्षण अद्याप प्राथमिक पातळीवर आहे. बेपत्ता विमानाचे अवशेष मिळणे ही मोठी घटना असून, फ्रान्समधील ला रियुनियन बेटावर इतरही अवशेष मिळतील, असे आॅस्ट्रेलियाचे वाहतूकमंत्री वॉरन ट्रस यांनी म्हटले आहे. ला रियुनियन हे बेट शोधस्थळापासून खूपच लांब आहे; पण विमानाने कदाचित हा मार्ग निवडला असण्याची शक्यता आहे, असे ट्रस यांनी म्हटले आहे.
‘ते’ अवशेष मलेशियाच्या विमानाचेच...?
By admin | Published: July 31, 2015 1:49 AM