लंडन : ग्रेट ब्रिटनच्या १.७४ कोटी नागरिकांनी सुमारे ५२ टक्के बहुमताने ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या बाजूने कौल दिला असला तरी जगभर ‘अर्थकंप’ घडविणाऱ्या ‘ब्रेक्झिट’चे कवित्व अद्याप संपलेले नाही. ‘ब्रेक्झिट’च्या नियमानुसार ‘निर्णायक’ नसल्याने पुन्हा कौल घेण्यात यावा, अशी विनंती १० लाखांहून अधिक नागरिकांनी केली आहे. ‘फारकत’ घेण्याच्या बाजूने मतदान करणाऱ्यांचाही भ्रमनिरास झाला आहे. ‘ब्रेक्झिट’च्या विरोधात मतदान करणाऱ्या लंडनवासीयांची ब्रिटनमधून फुटून, युरोपीय संघात सामील होण्याची मागणी आहे.लोकांचे म्हणणे असे आहे की, ‘ब्रेक्झिट’साठीच्या नियमानुसार जनमतात ७५ टक्क्यांहून कमी मतदान झाले व त्यात ईयूमध्ये राहण्याच्या वा बाहेर पडण्याच्या बाजूने ६० टक्क्यांहून कमी लोकांनी मते दिली तर पुन्हा कौल घेण्यात येईल. जनमतात मतदान ७२.२ टक्के झाले होते व ५१.९ टक्के मतदारांनी ‘ब्रेक्झिट’च्या बाजूने कौल दिला. १० हजारांहून जास्त स्वाक्षऱ्या असलेल्या ‘पीटिशन’ला सरकार प्रतिसाद देते. १ लाख स्वाक्षऱ्यांनी केल्या जाणाऱ्या ‘पीटिशन’वर ब्रिटिश संसदेच्या ‘हाउस आॅफ कॉमन्स’ या कनिष्ठ सभागृहात विचार केला जाऊ शकतो. समितीची बैठक आधी ठरल्यानुसार येत्या मंगळवारी व्हायची आहे. (वृत्तसंस्था)लंडनने वेगळी चूूल मांडावी : ६० टक्के लंडनवासीयांनी युरोपीय संघात राहण्याच्या बाजूने मतदान केले होते. परंतु अन्य भागाने वेगळा कौल दिल्याने त्यांची घोर निराशा झाली आहे. याला वाचा फोडण्यासाठी ४० हजारांहून अधिक लंडनवासीयांनी ‘चेंज आॅर्ग.कॉम’ या वेबसाईटवर ब्रिटनमधून फुटून निघण्याची मागणी करणारी एक ‘पीटिशन’ तयार केली आहे. अनेकांना होतोय पश्चात्तापसुरुवातीचा जल्लोष ओसरल्यानंतर अनेकांना निर्णयाचे किती खडतर परिणाम भोगावे लागणार आहेत याची जाणीव झाली असून, त्यांनी ‘ब्रेक्झिट’च्या बाजूने मत दिल्याबद्दल आता पश्चात्ताप होत असल्याची भावना प्रसिद्धिमाध्यमांकडे व्यक्त केली आहे.या परिणामांची कल्पना नव्हती, दिशाभूल करून मत देण्यास भाग पाडले गेले, असे काहींचे म्हणणे आहे. पुन्हा कौल घेतल्यास आपण युरोपीय संघात राहण्याच्या बाजूने मतदान करू, युरोपीय संघ सोडला तर चांगले दिवस येतील, असा प्रचार केला गेला, असे काहींनी सांगितले. इसिस खूशईयूमधून बाहेर पडण्याच्या ब्रिटनच्या निर्णयामुळे इसिसला आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. युरोपला दुबळे करण्याची ही योग्य वेळ असून, त्याच्या मुख्य भूमीवर हल्ला करावा, असे आवाहन संघटनेने जिहादींना केले आहे.
‘ब्रेक्झिट’वर पुन्हा कौल घ्या
By admin | Published: June 26, 2016 2:26 AM