वॉशिंग्टन : पती-पत्नी एकमेकांशी कितीही भांडण करू दे किंवा एकमेकांवर जिवापाड प्रेम करू दे, मात्र ते दोघेही नेहमी एकत्र राहिल्यास त्यांच्या ब्लड शुगरची पातळी कमी होण्याची शक्यता वाढते, अशी आनंदवार्ता ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. घटस्फोट किंवा मतभेदांमुळे पती-पत्नी वेगवेगळे राहत असतील तर त्यांची ब्लड शुगर वाढण्याचा धोका असतो. इंग्लंडमध्ये ५० ते ८९ वर्षे या वयोगटातील ३३३५ लोकांच्या आरोग्याचा अभ्यास केला. त्या पाहणीचा निष्कर्ष ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
विवाहाचे महिलांपेक्षा पुरुषांना अधिक फायदे -विवाहामुळे होणारे महिलांपेक्षा पुरुषांना अधिक मानसिक फायदे होतात असे एका पाहणीत आढळून आले आहे. जे पती-पत्नी एकत्र राहतात, त्यांना भेडसावणाऱ्या चिंतेचे प्रमाण एकटे राहणाऱ्यांपेक्षा कमी असते.
लग्न झालेल्या पुरुषांचे सरासरी आयुष्यमान एकट्या राहाणाऱ्या पुरुषांपेक्षा १० वर्षे अधिक असते, असेही या पाहणीच्या निष्कर्षात आढळले.
संशोधकांचे म्हणणे काय?या पाहणीत सहभागी झालेल्या संशोधक कॅथरिन फोर्ड यांनी सांगितले की, एकटे राहणाऱ्या व्यक्तीला डायबेटिस टाइप-२ होण्याचा धोका असतो.
एकत्र नांदणाऱ्या पती-पत्नीच्या ब्लड शुगरची पातळी कमी असल्याचे आढळले, तसेच त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही कमी होतो.