संयुक्त राष्ट्रे : रशियाने बेकायदेशीर सार्वमताच्या आधारे युक्रेनचे डोनेत्स्क, लुहान्स्क, खेरसन, झापोरिझिया हे चार प्रदेश विलीन करून घेतल्याचा निषेध करणारा ठराव अमेरिका व अल्बानिया या देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत शुक्रवारी मांडला होता. त्या ठरावावरील मतदानप्रसंगी भारत, चीन, गॅबॉन, ब्राझील हे चार देश तटस्थ राहिले. युक्रेनमधील हिंसाचार तातडीने थांबवून तेथील प्रश्नावर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढावा, असे या ठरावात म्हटले होते.
१५ देश सदस्य असलेल्या सुरक्षा परिषदेमध्ये मांडलेल्या या ठरावात म्हटले आहे की, युक्रेनच्या हद्दीतील चार प्रदेशांमध्ये रशियाने बेकायदेशीरपणे सार्वमताची प्रक्रिया २३ ते २७ सप्टेंबर या कालावधीत पार पाडली. या प्रदेशांवर रशियाने कब्जा केला असला तरी त्याला कोणतीही कायदेशीर मान्यता नाही. या चार प्रदेशांचे रशियाने केलेले विलीनीकरण अवैध आहे. ठरावावर मतदानाप्रसंगी रशियाने व्हेटोचा अधिकार वापरून हा ठराव फेटाळला. ठरावाच्या बाजूने १० देशांनी मतदान केले, तर भारतासह चार देश तटस्थ राहिले.
‘सर्वांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करावे’
संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या कायमस्वरूपी प्रतिनिधी रुचिरा कंबोज म्हणाल्या की, सध्याची वेळ ही युद्धाची नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना सांगितले होते. उझबेकिस्तानमधील समरकंद शहरात आयोजिलेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) परिषदेच्या वेळी या दोन नेत्यांची भेट झाली होती. सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय कायदे, संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्याचे पालन करावे, असे भारताचे मत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"