युक्रेनमधील युद्ध तात्काळ थांबवण्याच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मंजुरी मिळाली आहे. ज्यामुळे युक्रेन युद्ध थांबून दोन्ही देशांमध्ये शांतता स्थापित करण्यासाठी चर्चा होणार आहे. या प्रस्तावाच्या बाजूने १५ सदस्यीय कौन्सिलमधील १० जणांनी प्रस्तावाचं समर्थन केले तर फ्रान्ससह अन्य ५ देशांनी मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. याआधी भारत UNGA मध्ये प्रस्तावापासून दूर राहिले तर अमेरिकेने रशियाच्या बाजूने कौल दिला.
आतापर्यंत UNSC युद्धावर कुठलीही कारवाई करण्यात असमर्थ राहिले कारण रशिया आणि त्याचे सहकारी व्हिटोचा वापर करत होते. अमेरिकेने हा प्रस्ताव सादर केला होता ज्यावर व्हिटो अधिकार असलेले फ्रान्सशिवाय ब्रिटन, डेनमार्क, ग्रीस आणि स्लोवेनियासारख्या देशांनी मतदानात भाग घेण्यास नकार दिला.
UNSC मंजूर झालेल्या प्रस्तावात काय म्हटलंय?
संयुक्त राष्ट्राचे कार्यवाहक अमेरिकन राजदूत डोरोथी शीया यांनी चर्चेत सांगितले की, या प्रस्तावामुळे आपण शांततेच्या दिशेने जाऊ शकतो. हे पहिले पाऊल असून महत्त्वाचे आहे. ज्यावर आपल्या सर्वांना अभिमान असायला हवा असं त्यांनी म्हटलं. यूनाइटेड नेशनचं उद्दिष्टे जागतिक शांतता आणि सुरक्षा कायम ठेवणे हे आहे. जे वादाचे मुद्दे आहेत त्यांच्यावर शांततापूर्ण तोडगे काढले जावेत. युद्ध तातडीने थांबवून शांतता जपली पाहिजे असं या प्रस्तावात मांडले होते.
UNGA मध्ये अमेरिकेला करावी लागली तडजोड
संयुक्त राष्ट्र परिषदेत युद्ध रोखण्याच्या मागणीसह २ प्रस्ताव पारित करण्यात आले. ज्यामुळे युक्रेनमधील युद्ध थांबवण्याचा मार्ग मोकळा झाला. अमेरिका आणि युरोप यांच्यात सुरू असलेला तणाव या परिषदेत पाहायला मिळाला, जिथं अमेरिकेला स्वतःच्या प्रस्तावावर तडजोड करावी लागली. युक्रेनवरील रशियन हल्ल्याच्या तिसऱ्या वर्षी युरोपीय देशांनी युद्ध संपवण्याचे आवाहन करणारा ठराव मांडला ज्यामध्ये रशियावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. अमेरिका, इस्त्रायल आणि उत्तर कोरियासह १८ देशांनी रशियाची साथ देत युरोप आणि युक्रेनकडून सादर केलेल्या प्रस्तावाला विरोध केला,ज्यात ट्रम्प प्रशासनाने युक्रेन युद्धाविरोधात धोरण बदलल्याचं स्पष्ट दिसून आले.