बीजिंग : सर्व दक्षिण आशियाई देशांना व्यापारी मार्गांनी जोडण्याच्या चीनच्या ‘वन बेल्ट, वन रोड’ (बीआरएफ) या महत्त्वाकांक्षी योजनेवर चीनने आयोजित केलेली दोनदिवसांची शिखर परिषद रविवारी येथे सुरू झाली. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी उद््घाटनाच्या भाषणात प्रत्येक देशाने इतरांचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडत्व, आगळी वेगळी संस्कृती आणि आशा-आकांक्षांचा आदर करण्यावर भर दिला. भारताने सार्वभौमत्वाचा मुद्दा उपस्थित करून या परिषदेवर बहिष्कार घातला आहे. या पार्श्वभूमीवर शी यांनी वरील मत व्यक्त केले. आपल्या उद्घाटकीय भाषणात चीनचा दृष्टिकोन मांडताना शी यांनी प्राचीन रेशीम मार्गाचा संदर्भ दिला. त्यांनी सिंधू तसेच गंगा संस्कृतीसह विविध संस्कृतींचाही उल्लेख केला. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरवरील भारताच्या आक्षेपांचा संदर्भ न देता शी म्हणाले की, सर्व देशांनी परस्परांंचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता यांचा आदर केला पाहिजे. हा कॉरिडॉर आपल्यासाठी सार्वभौमत्वाच्या काळजीचे कारण बनणार असल्याचे सांगून भारताने या परिषदेत भाग घेतला नाही. हा कॉरिडॉर पाकव्याप्त काश्मिरातून जाणार आहे. बीजिंगमध्ये होत असलेल्या या परिषदेत २९ देशांचे नेते सहभागी झाले आहेत. बेल्ट अॅण्ड रोड योजनेत भाग घेत असलेल्या देशांचा छोटा गट बनविण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचा आरोप आहे. तो फेटाळून लावताना शी म्हणाले की, शांततेचा मार्ग बनविण्याची चीनची योजना आहे. (वृत्तसंस्था)बीजिंग : चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अॅण्ड रोड शिखर परिषदेवर बहिष्कार टाकून भारताने पाकव्याप्त काश्मिरातून जाणाऱ्या वादग्रस्त चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला असलेला आपला विरोध नव्या उंचीवर नेला. भारताने या परिषदेत सहभागी व्हावे यासाठी चीनने सर्वतोपरी प्रयत्न केले; मात्र भारत ठाम राहिला. भारताच्या बहिष्काराचे पाकिस्तानने लगेच भांडवल केले. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडार हा या भागातील सर्व देशांसाठी खुला असलेला आर्थिक प्रकल्प असून, त्याचे निश्चितपणे राजकारण केले जाऊ नये, असे म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतावर टीका केली. भारताचा एकही अधिकारी परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित नव्हता.
परस्परांच्या सार्वभौमत्वाचा सर्वांनी आदर करावा : शी
By admin | Published: May 15, 2017 12:19 AM