तुर्कीमध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांनी मदतीची विनंती करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केल्याची घटना समोर आली आहे. लोकेशन शेअर करून आपला जीव वाचवण्याचे आवाहन केले. त्यामुळे अनेकांचा शोध घेता आला आणि अनेकांचे प्राण वाचवण्यात बचाव कर्मचार्यांना यश आले. अशाच प्रकारे एका विद्यार्थ्याने Whatsapp चा वापर केला, त्यानंतर त्याला आणि त्याच्या आईला वाचवण्यात यश आले आहे.
बोरान कुबत असं या 20 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव असून त्याने Whatsapp व्हिडीओ अपीलमध्ये त्याचे लोकेशन शेअर केले होते, त्यानंतर तुर्कीमधील एका अपार्टमेंटच्या ढिगाऱ्याखालून त्याला वाचवण्यात यश आले. बोरान कुबत आपल्या आईसह इस्तंबूलहून मालत्याला आला. त्यामुळेच सोमवारी आलेल्या भीषण भूकंपाच्या तडाख्यात हे कुटुंब देखील सापडले. पहाटेच्या पहिल्या भूकंपातून वाचल्यानंतर हे कुटुंब पुन्हा इमारतीत गेले.
7.5 रिश्टर स्केलच्या दुसऱ्या भूकंपानंतर मात्र ही इमारत कोसळली. अपार्टमेंटच्या ढिगाऱ्याखाली आपल्या नातेवाईकांसह अडकलेल्या बोरान कुबतने आपल्या मित्रांना सावध करण्यासाठी आपल्या स्मार्टफोनवर सोशल मीडियाचा वापर केला. बोरानने Whatsapp चा वापर करून मदतीची याचना करणारा व्हिडीओ मेसेज रेकॉर्ड केला आणि त्याचे लोकेशन शेअर केले.
बोरान कुबतने म्हटलं की, 'ज्याला हे Whatsapp लोकेशन दिसलं असेल, कृपया या आणि मदत करा. कृपया सर्वजण या आणि आत्ताच आम्हाला वाचवा.' तेव्हा बचावकर्ते कुटुंबाला शोधण्यात आणि बोरान आणि त्याच्या आईला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यशस्वी झाले. बोरानने तुर्कीच्या सरकारी न्यूज एजन्सीला सांगितले की, अचूक जागा शोधण्यासाठी त्याच्या मित्रांना चार ते पाच वेळा प्रयत्न करावे लागले. त्यानंतरही त्याचे काका आणि आजी अडकले असल्याचेही त्याने सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"