मुंबई: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज कोरोनाचे ४ लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. मात्र त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र कोरोनाचे नवे व्हेरिएंट आणि कोरोनामुक्त झाल्यानंतर जाणवणारे साईड इफेक्ट्स चिंतेचं कारण ठरत आहेत.
जपानमध्ये एका वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. त्यांना घशात खवखव जाणवत होती. हळूहळू त्रास वाढू लागला. त्यांच्यावर सध्या टोकियो वैद्यकीय विद्यापीठात उपचार सुरू आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर वृद्धाला रेस्टलेस ऍनल सिंड्रोमचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे गुदद्वाराजवळ असह्य त्रास होऊ लागला. कोरोना रुग्णात पहिल्यांदाच अशा प्रकारचा साईड इफेक्ट्स आढळून आला आहे.
वृद्धाला अस्वस्थ वाटत असून त्याला झोप येत नाही. यामागचं कारणदेखील रेस्टलेस ऍनल सिंड्रोम आहे. या सिंड्रोमची समस्या जाणवत असलेल्या व्यक्तीला बसताना, चालता-फिरताना, इतकंच काय तर आराम करतानाही त्रास होतो. त्यामुळे हा कोरोनाचा सर्वाधिक त्रासदायक साईड इफेक्ट्स आहे.
आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकाही रुग्णाला अशा प्रकारचा त्रास जाणवलेला नाही, असं डॉ. इटारू नाकामुरा यांनी सांगितलं. 'कोरोनामुक्त झाल्यानंतरही वृद्ध रुग्णाला त्रास सुरू होता. त्यांना अस्वस्थ वाटत होतं. आराम केल्यानंतर ही समस्या आणखी वाढली. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना आम्ही आराम करण्याचा सल्ला देतो. मात्र या परिस्थितीत रुग्णांना आरामही करता येत नाही', अशी माहिती नाकामुरा यांनी दिली.