बीजिंग : स्मार्टफोनच्या अतिवापराबाबत चीन आता कठोर झाला असून, स्मार्टफोनच्या वापरावर अंकुश ठेवण्यासाठी नवीन नियम लागू करण्याचा विचार करत आहे. सायबरस्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ चायनाने त्यांच्या संकेतस्थळावर मोबाइल वापराबाबत मसुद्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रकाशित केली आहेत. त्यानुसार १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी स्मार्टफोन वापरण्याची वेळ दिवसाला २ तास करण्यात येणार आहे.
चीनच्या या निर्णयामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ऑनलाइन गेम्स चालवणाऱ्या टेनसेंट आणि बाइट डान्ससारख्या कंपन्यांना धक्का बसला आहे. केवळ मसुद्यामुळे तंत्रज्ञान कंपन्यांचे समभाग धडाधड कोसळले आहेत. अल्पवयीन मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी योग्य समजल्या जाणाऱ्या ॲप्स आणि प्लॅटफॉर्मसारख्या काही सेवांनाच सूट दिली जाईल. तथापि, कोणत्या इंटरनेट सेवांना सूट दिली जाईल हे स्पष्ट केले नाही. सीएसीने म्हटले की लोक २ सप्टेंबरपर्यंत मसुद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांवर त्यांच्या सूचना देऊ शकतात. मात्र, नवे नियम कधीपासून लागू होणार याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही.
गेमिंग निर्बंधांसह मोबाइल वापरासाठी नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी तंत्रज्ञान दिग्गज कंपन्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. मुलांसाठी हा एक चांगला उपाय आहे. लहान मुले त्यांच्या पालकांच्या मोबाइलवर पासवर्ड मिळवू शकतात. मात्र गेमबाबत निर्बंध लागू करण्यावर एकमत होत असल्याचे तंत्रज्ञान कंपन्यांनी म्हटले आहे.
कुणासाठी काय नियम? - अल्पवयीन मुलांना रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत मोबाइलवर इंटरनेट वापरण्याची परवानगी नसेल.- १६ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांना दिवसातून फक्त दोन तास इंटरनेट वापरता येणार आहे.- ८ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना दिवसातून फक्त एक तास स्मार्टफोन वापरण्याची परवानगी असेल. - आठ वर्षांखालील मुलांना फक्त ४० मिनिटांची परवानगी असेल.