तेरहान - अणुकार्यक्रमामुळे अमेरिकेने इराणवर घातलेल्या कडक आर्थिक निर्बंधांचा प्रभाव दिसू लागला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या इराणचे चलन दिवसेंदिवस कोसळत असून, शनिवारी एका डॉलरच्या बदल्यात 1 लाख 12 हजार इराणी रिआल इतकी विक्रमी घसरण इराणच्या चलनाची झाली. शरिवारी एका डॉलरची किंमत 98 हजार रिआल एवढी होती. जानेवारी महिन्यात एका डॉलरची किंमत 35 हजार 186 एवढी होती. दरम्यान, गेल्या चार महिन्यांमध्ये इराणी रिआलच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. मार्च महिन्यात रिआलची किंमत एका डॉलरच्या बदल्यात 50 हजार रिआरपर्यंत घसरली होती. त्यानंतर इराणी सरकारने एप्रिल महिन्यात हा दर 42 हजारांवर स्थिर करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. पण त्यानंतरही इराणी चलनाची घसरगुंडी सुरूच आहे. अर्थव्यवस्थेत होत असलेल्या पडझडीमुळे इराणी नागरिक चिंतीत झाले आहे. त्यामुळे आपली बचत आणि गुंतवणुकीला ते डॉलरच्या रूपात सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान रिआलच्या किमतीमधील घसरण अजून काही काळ सुरू राहण्याची शक्यता आहे. मे महिन्यात अमेरिकेने अणुकरारामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इराणला पुन्हा एकदा निर्बंधांचा सामना करावा लागला. अमेरिकेने गतवर्षी 6 ऑगस्ट आणि 4 नोव्हेंबर रोजी इराणवर निर्बंध लादण्याची घोषणा केली होती.
एक डॉलरच्या बदल्यात 1,00,000 रिआल, अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराणचे चलन कोसळले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 6:31 PM