वॉशिंग्टन : अंतराळात जवळपास वर्षभर वास्तव्य केल्यानंतर स्कॉट केली आणि मिखाईल कोर्नियन्को हे अंतराळवीर बुधवारी सुखरूप पृथ्वीवर परतले. स्कॉट अमेरिकन तर कोर्नियन्को हे रशियन अंतराळवीर आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ३४० दिवस वास्तव्य केले. हा कालावधी अंतराळ स्थानकावरील सामान्य वास्तव्याच्या दुप्पट आहे. अवकाशातील दीर्घ वास्तव्याचा मानवी शरीरावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी स्कॉट व मिखाईल यांचा अंतराळ मुक्काम वाढविण्यात आला होता. शास्त्रज्ञांना या दोघांच्या आरोग्याचा अभ्यास करण्यासह स्कॉटच्या आरोग्याची तुलना त्याचा पृथ्वीवरील जुळा भाऊ मार्क याच्या आरोग्याशीही करता येणार आहे. मार्क केली हे निवृत्त अंतराळवीर आहेत. त्यांचे बंधू स्कॉट अंतराळ सफरीवर असताना पृथ्वीवर मार्क यांच्या विविध चाचण्या घेण्यात येत होत्या. या चाचण्यांची तुलना आता स्कॉट यांच्या चाचण्यांशी करून वैज्ञानिकांना अंतराळातील वास्तव्याचा मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांची अधिक सखोल माहिती मिळवता येणार आहे. स्कॉट, मिखाईलसह रशियन चालक दल सदस्य सर्गेय व्होलकोव्ह यांना घेऊन आलेले सोयुझ यान कझाकिस्तानात उतरले.
३४० दिवसांनी परतले अंतराळवीर
By admin | Published: March 03, 2016 3:41 AM