जेरुसलेम : इराणच्या हल्ल्यानंतर बदल्याची कारवाई न करण्याचे आवाहन जागतिक नेत्यांनी केल्यानंतरही इस्रायलकडूनइराणवर हल्ला होण्याची भीती वाढली आहे. आमच्याकडे इराणने केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्याशिवाय पर्याय नसल्याचा इशारा इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी दिला आहे. तर आम्ही पुन्हा एकदा इस्रायलवर हल्ला करू शकतो, असा इशारा इराणने दिल्यामुळे युद्धाचा भडका वाढण्याची भीती आहे.
सध्या दोन्ही देशांतील परिस्थिती तणावपूर्ण, परंतु नियंत्रणात आहे. सर्वांचे लक्ष अमेरिकेने बोलावलेल्या जी-७ राष्ट्रांच्या येत्या रविवारी होणाऱ्या बैठकीत काय होते, याकडे लागले आहे. ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड कॅमेरॉन यांनी सांगितले की, ब्रिटन प्रत्युत्तराच्या हल्ल्याला समर्थन देणार नाही. वाद वाढवून प्रतिहल्ला करू नये, असे इस्रायलला पटवून देण्याचा प्रयत्न करू, असे फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले.
‘हल्ल्याची किंमत वसूल करणार’- इस्रायलच्या युद्धविषयक मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री गदी ईसेनकोट यांनी हमाससारख्या सर्वात कमकुवत शत्रूने इस्रायलचे मोठे नुकसान केले, असा सूर आळवत रणनीती बदलण्याचे आवाहन केले.- इस्रायलचे मंत्री बेनी गँट्झ यांनी इराणवर योग्य वेळी कारवाई करून हल्ल्याची किंमत वसूल केली जाईल, असा इशाराही दिला आहे. त्यामुळे जगभरात तणाव वाढला आहे.
युद्धामुळे कर्ज झाले दुप्पटइस्रायलने गाझात सुरू केलेल्या युद्धामुळे गेल्या वर्षी देशाचे कर्ज दुप्पट झाले, अशी माहिती त्यांच्या अर्थ मंत्रालयाने दिली. इस्रायलवर २०२३ मध्ये ४३ अब्ज डॉलर्सचे कर्ज वाढले असून, २०२२ मध्ये १७ अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले होते. अनिश्चितता आणि आव्हाने असूनही स्थानिक, जागतिक बाजारपेठेत कर्ज उभारण्याची देशाची क्षमता असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
१७ भारतीयांच्या सुटकेसाठी इराणला विनंती केली : जयशंकरइराणच्या सैन्याने जप्त केलेल्या पोर्तुगीज मालवाहू जहाजावरील १७ भारतीयांची सुटका करण्यासाठी भारताने इराणला विनंती केली आहे आणि तेहरानने त्यास चांगला प्रतिसाद दिला आहे, असे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी बंगळुरूत सांगितले. जयशंकर यांचे इराणचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमीर-अब्दोल्लाहियान यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे.
अमेरिका उतरली इस्रायलच्या मदतीला- इराणने इस्रायलवर सोडलेली ८० हून अधिक ड्रोन आणि किमान सहा आंतरखंडीय क्षेपणास्त्रे अमेरिकेने नष्ट केली, असे पेंटागॉनने रविवारी सांगितले.- इराणने इस्रायलवर ३०० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली होती. जवळजवळ सर्व इराणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रे इस्रायली, अमेरिका आणि सहयोगी सैन्याने त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच पाडण्यात आली.