ऑनलाइन लोकमत
मनिला, दि. 30 - कठोर कायदे असलेल्या आखाती देशांपासून ते भारतापर्यंत खुनासारख्या गंभीर गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा सुनावली जाते. आखाती देशात खुनासाठी थेट देहदंडच दिला जातो, तर अन्य देशातही अशा गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा देण्याबाबत न्यायव्यवस्था प्रयत्नशील असते. पण जागाच्या पाठीवर असा एक देश आहे जिथे हत्येसाठी शिक्षा होत नाही तर अशा आरोपीला थेट रोख बक्षीस दिले जाते.
फिलिपिन्स असे या देशाचे नाव असून, तेथे हा विचित्र कायदा आहे. न्यूज 24 च्या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार फिलिपिन्समध्ये पोलीस आणि सर्वसामान्यांना गुन्हेगारांना ठार मारण्याचा खास अधिकार देण्यात आला आहे. त्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने कुठल्याही गुन्हेगाराची हत्या केल्यास त्याच्यावर कुठलाही खटला चालत नाही, तर अशा व्यक्तीला बक्षिसी देण्यात येते. फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिग्स दुतेर्तो यांनी देशात अंमली पदार्थांच्या तस्करांची हत्या केल्यास 100 डॉलर रोख बक्षीस दिले जातील अशी घोषणा केलेली आहे, तेव्हापासून पोलीस आणि सामान्य नागरिकांनी सुमारे सहा हजार अंमली पदार्थांच्या तस्करांना ठार मारले आहे. तर मरणाच्या भीतीने सुमारे एक लाख तस्करांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.