मॉस्को: युक्रेनवर हल्ला केल्याने रशियाच्या राज्यकर्त्यांपेक्षा तेथील जनतेला भोगावे लागणार आहे. मोठमोठ्या कंपन्यांनी रशियाला सेवा देण्यास नकार दिला आहे. एवढे की रशियन लोक त्यांची एटीएम वापरू शकत नाहीत की पैसे वाढू शकत नाहीत. अनेकांच्या मोबाईलमधील सेवा बंद झालेल्या आहेत. पुढेही हे भोग भोगायचे आहेत. लोकांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या या युद्धाच्या निर्णयाविरोधात आंदोलने सुरु केली असून एका अब्जाधीशाने तर पुतीन यांना जो कोणी जिवंत किंवा मृत आणून देईल त्याला १ दशलक्ष डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे.
भारतीय रुपयांत ही रक्कम जवळपास साडे सात कोटी रुपये होते. रशियाचे उद्योगपती एलेक्स कोन्याखिन यांच्या डोक्यावर हा इनाम घोषित केला आहे. 'Wanted: Dead or Alive. For Mass Murder' अशा प्रकारचे पोस्टर त्यांनी लिंक्डइनवर शेअर केले आहे. पुतीन यांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार युद्ध गुन्हेगारी केली आहे, त्या बदल्यात त्यांना जो कोणी जिवंत किंवा मृत पकडून आणेल त्याला १ दशलक्ष डॉलरचे बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा केली आहे.
कोन्याखिन यांच्या या पोस्टला फेसबुकने नियमांचे उल्लंघन मानत हटविले आहे. यावर उद्योगपतीने स्पष्ट करताना म्हटले की, मी लोकांना पुतीन यांना मारण्यास सांगितले नाही. माझा उद्देश तो नव्हता. त्यांना कायद्याच्या चौकटीत आणले जावे, हा माझा उद्देश होता. कोन्याखिन यांची ही पोस्ट युक्रेन हल्ल्याच्या आठ दिवसांनी आली आहे. युक्रेनमध्ये रशियाने खूप नुकसान केले आहे. विद्ध्वंस माजविला आहे. तर युक्रेननेही रशियाला पुरते बेजार करत ९००० सैनिकांना मारल्याचा दावा केला आहे. तसेच शेकडो रणागाडे, युद्धक वाहने, लढाऊ विमाने नष्ट केल्याचे म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे अमेरिकेच्या खासदारानेही पुतीन यांची हत्या करण्यात यावी, म्हणजे युद्ध थांबेल असे म्हटले आहे.