बांगलादेशात मागील काही दिवसापासून नोकरीतील आरक्षणावरुन विद्यार्थ्यांनी निदर्शने सुरू केली आहेत. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजिनामा देऊन देश सोडला. दरम्यान, बांगलादेशमध्ये शनिवारी पुन्हा एकदा निदर्शने सुरू झाली. आंदोलकांनी आता ढाका येथील सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला आणि सरन्यायाधीशांसह सर्व न्यायाधीशांना तासाभरात राजीनामा देण्यास सांगितले. वाढता विरोध पाहून बांगलादेशचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी न्यायपालिकेच्या प्रमुखपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन; जाणून घ्या, आंदोलक विद्यार्थ्यांसह कोणाकोणाचा समावेश?
न्यायमूर्ती आणि सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी राजीनामा न दिल्यास त्यांच्या निवासस्थानावर हल्ला करू, असा इशारा आंदोलकांनी दिला होता. काही दिवसापूर्वी प्रचंड विरोध झाल्यानंतर शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. सरन्यायाधीशांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करत शेकडो आंदोलकांनी, बहुतांश विद्यार्थ्यांनी शनिवारी बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला.
सरन्यायाधीशांनी पूर्ण न्यायालयाची बैठक बोलावल्याचे वृत्त येताच विद्यार्थी आणि वकिलांसह शेकडो आंदोलक सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने गेले. अब्दुल मुकाद्दीम नावाच्या आंदोलकाने दावा केला की, मुख्य न्यायाधीश अंतरिम सरकारला बेकायदेशीर घोषित करण्याचा कट रचत आहेत. फॅसिस्ट अंतरिम सरकारला बेकायदेशीर घोषित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि मुख्य न्यायमूर्तींचा वापर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळेच आम्ही मुख्य न्यायाधीशांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलात आलो आहोत," असे मुकाद्दिम यांनी सांगितले.
अंतरिम सरकारच्या क्रीडा मंत्रालयाचे सल्लागार असिफ महमूद यांनीही "मुख्य न्यायाधीश ओबेदुल हसन यांचा बिनशर्त राजीनामा" आणि पूर्ण न्यायालयाची बैठक रद्द करण्याची मागणी केली.
बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन
बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचार सुरू होता. ही परिस्थिती अखेर नियंत्रणाबाहेर गेल्यामुळं शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत बांगलादेशातून पळ काढला आहे. यानंतर आता परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे. या सरकारचे अंतरिम नेतृत्व नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस करत आहेत.
मोहम्मद युनूस यांनी गुरुवारी (८ ऑगस्ट) पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोहम्मद युनूस यांच्यासोबत आणखी १६ सदस्यांनीही शपथ घेतली आहे, ज्यामध्ये ४ महिलांचाही समावेश आहे. ढाका येथील राष्ट्रपतींचे निवासस्थान बंगभवन येथे हा शपथविधी सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच दोन २६ वर्षांच्या विद्यार्थ्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये शेख हसीना यांच्या विरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी नेते नाहिद इस्लाम आणि आसिफ मेहमूद यांचा समावेश आहे. या दोघांनी देशभरात झालेल्या आरक्षणविरोधी आंदोलनाचं नेतृत्त्व केलेलं आहे.