जगाला शिस्तप्रियतेचे धडे देणाऱ्या ब्रिटनच्या लीड्समध्ये रात्री अचानक मोठी दंगल उसळली आहे. हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि वाहनांची तोडफोड, आस्थापनांची तोडफोड आगी लावण्यास सुरुवात केली. जमावाने पोलिसांच्या गाडीवरही हल्ले केले. या दंगेखोरांमध्ये लहान मुलेदेखील होती.
सोशल मीडियावर या दंगलीचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. ब्रिटनमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत. यानंतर अचानक दंगल उसळल्याने खळबळ उडाली आहे. दंगलीमागे स्थानिक चाईल्ड केअर एजन्सीविरुद्धचा संताप असल्याचे सांगितले जात आहे. या चाईल्ड केअर एजन्सीने लहान मुलांना त्यांच्या आई-वडिलांपासून दूर करून चाईल्ड केअर होममध्ये ठेवले होते. याविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत.
वेस्ट यॉर्कशायर पोलिसांनी याची पुष्टी केली आहे. लीड्सच्या हेअरहिल्स भागात लग्झर स्ट्रीटवर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता लोक जमायला सुरुवात झाली होती. यामध्ये काही लहान मुलेही होती. लोक जमताच जमाव अचानक हिंसक झाला आणि दंगल पसरली. यामध्ये कोणाच्या जखमी होण्याची बातमी नसली तरी करोडोंचे नुकसान झाले आहे.
एका सात महिन्यांच्या लहान बाळाला डोक्याला दुखापत झाली होती. यामुळे सरकार पुरस्कृत एजन्सीने तेथील पाच मुलांना त्यांच्या पालकांपासून दूर करून चाईल्ड केअरमध्ये ठेवले होते. परदेशात लहान मुलांना योग्य प्रकारे सांभाळायला येत नसेल किंवा लहान मुलांवर पालक अत्याचार करत असतील तर सरकार पोलिसांच्या मदतीने या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी चाईल्ड केअरकडे देते. या प्रकारामुळे जमाव संतप्त झाला होता.