ब्रिटन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) हे पाचव्या फेरीत सुद्धा अव्वल ठरले आहेत. त्यांना 137 मते मिळाली आहेत. मतदानाच्या पाचव्या फेरीसह पेनी मॉर्डाउंट पंतप्रधानांच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्यांना 105 मते मिळाली. आता पुढील फेरीत ऋषी सुनक यांचा सामना लिझ ट्रस यांच्यासोबत होणार आहे. लिझ ट्रस यांना 113 मते मिळाली आहेत.
पाचही फेऱ्यांमध्ये ऋषी सुनक यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. चौथ्या फेरीच्या मतदानात त्यांना 118 मते मिळाली होती. सोमवारी झालेल्या तिसऱ्या फेरीच्या मतदानात त्यांना 115 मते मिळाली होती. तसेच, दुसऱ्या फेरीत 101 तर पहिल्या फेरीत 88 मते मिळाली होती. दरम्यान, ऋषी सुनक सर्व टप्प्यांवर आघाडीवर राहिले आहे.
यानंतर आता टोरी पक्षाच्या सदस्यसंख्येच्या बाजूने लक्ष केंद्रित केले जाईल. या सदस्यांची संख्या जवळपास 160,000 असल्याचा अंदाज आहे, जे या दोन उमेदवारांपैकी एकाच्या बाजूने मतदान करतील. ऑगस्टच्या अखेरीस त्या मतांची मोजणी केली जाईल आणि 5 सप्टेंबरपर्यंत विजेत्याची घोषणा केली जाईल.
दरम्यान, ब्रिटनचे काळजीवाहू पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर ब्रिटनचा पुढील पंतप्रधान कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. यात ऋषी सुनक ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.
ऋषी सुनक यांच्याविषयी...ऋषी सुनक यांचे आई-वडील 1960 मध्ये भारतातून ब्रिटनला गेले होते. 1980 साउथम्पैटनमध्ये ऋषी सुनक यांचा जन्म झाला. वडील डॉक्टर होते. ऋषी सुनक यांना आणखी दोन भावंडे आहेत. ब्रिटेन विंचेस्टर कॉलेजमध्ये पॉलिटिकल सायन्समधून पदवी घेतली होती. ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीतून फिलॉसॉफी आणि इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला. ते काही काळ गोल्डमैन सॅक्समध्ये काम करत होते. नंतर हेज फंड फर्म्समध्ये पार्टनर बनले. स्टैनफोर्ड यूनिवर्सिटीमध्ये एमबीए करत असताना त्यांची ओळख अक्षता मूर्तिसोबत झाली. यानंतर त्यांनी लग्न केले. त्यांना कृष्णा आणि अनुष्का अशी दोन मुले आहेत.