लंडन - ब्रिटनच्या तिजोरीच्या किल्ल्या भारतीय वंशाच्या तरुणाच्या हाती आल्या आहेत. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या वित्तमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सुनक यांना आपल्या मंत्रिमंडळात ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. ऋषी सुनक हे इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते सांभाळणारे ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे दुसरे व्यक्ती ठरले आहेत. या मंत्रिमंडळात समावेश असलेल्या प्रीती पटेल यांच्याकडे सध्या ब्रिटनच्या गृहमंत्रालयाची जबाबदारी आहे. तत्पूर्वी ब्रिटनच्या वित्तमंत्रालयाची जबाबदारी पाकिस्तानी वंशाचे साजिद जाविद यांच्याकडे होती. त्यांनी हल्लीच राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ऋषी सुनक यांची वित्तमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे.
डिसेंबरमध्ये झालेल्या ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षाने विजय मिळवला होता. त्यानंतर जॉन्सन यांनी आपल्या मंत्रिमंडळात काही महत्त्वपूर्ण बदल केले होते. ३९ वर्षीय ऋषी सुनक हे गोल्डमॅन सॅशमध्ये बँकर म्हणून कार्यरत होते.