लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटिश पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचाच दावा सर्वात मजबूत असल्याचे मानले जात आहे. सुनक यांनी आवश्यक १०० खासदारांचा पाठिंबा मिळविल्याचा दावा त्यांच्या पाठीराख्यांनी केला. तर दुसरीकडे आज बोरिस जॉन्सन आणि ऋषी सुनक यांच्यात 'गुप्त बैठकझाली आहे, सुनक यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे.
ऋषी सुनक यांनी आज ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी औपचारिकपणे उमेदवारी जाहीर केली," अर्थव्यवस्था सुधारायची आहे आणि देशासाठी काम करायचे आहे, असंही सुनक म्हणाले.
पंतप्रधानपदासाठी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या दावेदारांकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या शर्यतीत ऋषी सुनक, बोरिस जॉन्सन आणि पेनी मॉर्डेंट यांची नावे आघाडीवर आहेत. आता ऋषी सुनक आणि बोरिस जॉन्सन यांच्यात गुप्त बैठक झाल्याचे समोर आले आहे.
सुनक जॉन्सन सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून काम करत होते. त्यानंतर सुनक यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करत राजीनामा दिला. त्यानंतर इतर खासदारांनीही राजीनामा दिला.त्यामुळे जॉन्सन यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर लिझ ट्रस नवीन पंतप्रधान बनल्या. मात्र, त्या जास्त काळ सरकार चालवू शकल्या नाहीत.
या आठवड्यात ब्रिटनमध्ये कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नव्या नेत्याची निवड होणार असून ते पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारतील. दरम्यान, शनिवारी, ऋषी सुनक आणि बोरिस जॉन्सन या दोन नेत्यांची बैठक झाली. भारतीय वंशाचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक हे कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतृत्वाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. त्यांनी मतपत्रिकेसाठी आवश्यक असलेल्या १०० हून अधिक खासदारांचा पाठिंबा मिळवला आहे.