Rishi Sunak, Last Speech as PM: प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ति यांचे जावई असलेले ऋषी सुनक यांना निवडणुकीतील पराभवानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानवरून पायउतार व्हावे लागले. ब्रिटनच्या लेबर पार्टीचे नेते केयर स्टारर हे नवे पंतप्रधान बनले. शुक्रवारी त्यांनी बकिंगहॅम पॅलेसमध्ये राजा चार्ल्स तिसरे यांची भेट घेतली आणि अधिकृतपणे पदभार स्वीकारला. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते ऋषी सुनक यांनी '10 डाऊनिंग स्ट्रीट'च्या पायऱ्यांवर निरोपाचे भाषण दिले. या भाषणावेळी, "मी या पदावर असताना देशवासीयांच्या सेवेसाठी सर्वतोपरि प्रयत्न केले आणि माझे नाव नक्कीच इतिहासात लक्षात ठेवले जाईल", असे म्हणत त्यांनी पंतप्रधानपदाचा निरोप घेतला.
ऋषी सुनक हे ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे नेते, पहिले हिंदू नेते आणि पहिले गैर-गौरवर्णीय समुदायाचे नेते होते. ते म्हणाले, "नव्या ब्रिटनच्या जडणघडणीमध्ये सर्वोत्तम गोष्टींपैकी एक म्हणजे देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीने पोहोचणे हे प्रत्येकासाठी प्रेरणा देईल. विशेषत: येथे राहणाऱ्या १.८ दशलक्ष भारतीयांना नक्कीच ही बाब प्रभावित करेल."
"कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सर्व उमेदवार आणि प्रचारक, ज्यांनी अथक परिश्रम केले परंतु त्यांना यश आले नाही, त्यांनी खचून जाऊ नका. मला खेद वाटतो की मी तुमच्या अपेक्षांना पात्र ठरू शकलो नाही. पण तुम्हा सर्वांच्या मेहनतीबद्दल, तुमच्या सेवेबद्दल मी तुमचे आभार मानतो. तसेच मी ब्रिटनच्या नागरिकांची माफी मागतो. मी या देशासाठी सर्वस्व पणाला लावून काम केले. पण तुम्ही स्पष्ट संकेत दिलेत की ब्रिटनचे सरकार बदलले पाहिजे. तुमचा हा निर्णय महत्त्वाचा आहे आणि मला मान्य आहे. तुमचा रोष, तुमची निराशा याची मी जबाबदारी घेतो." असेही सुनक यांनी प्रामुख्याने नमूद केले.
"तुमचा पंतप्रधान म्हणून मी पहिल्यांदा इथे उभा राहिलो, तेव्हा मी तुम्हाला सांगितले होते की माझ्याकडे असलेले सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेला स्थिरता आणणे. महागाईवर नियंत्रण आणणे. या कार्यकाळात आपल्या देशाचे जगात स्थान वाढले आहे. मित्रराष्ट्रांशी संबंध पुन्हा निर्माण केले आहेत. त्यामुळेच ब्रिटन परिवर्तनशील तंत्रज्ञानाच्या नवीन पिढीचे माहेरघर बनत आहे आणि मला त्या यशाचा अभिमान आहे," अशा शब्दांत सुनक यांनी आपल्या कार्याचा थोडक्यात माहिती दिली आणि दिलेल्या देशवासीयांचे आभार मानले.