ब्रिटनमध्ये आज मतदानाला सुरुवात झाली आहे. स्थानिक वेळेनुसार गुरुवारी सकाळी सात ते रात्री १० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी ११.३० ला मतदान सुरु झाले आहे. भारतासाठी ही निवडणूक ऋषी सुनक यांच्यामुळे महत्वाची असणार आहे. गेल्या १८ महिन्यांपासून सुनक ब्रिटनच्या पंतप्रधानपदी आहेत. परंतू, निवडणूकपूर्व सर्व्हेनुसार सुनक पराभवाच्या छायेत असून त्यांचे विरोधक कामगार पक्षाचे नेते कीर स्टार्मर हे जिंकण्याची शक्यता आहे.
दोन वर्षांपूर्वी ब्रिटनने युरोपीय देशांपासून वेगळी वाट पकडली आहे. यानंतर सुनक पंतप्रधान झाले आहेत. सुनक हे फाळणीपूर्व भारताचे नागरिक आहेत, तर आता इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. कामगार पक्ष प्रचंड बहुमताने सत्तेत येईल असे तेथील सर्व्हे सांगत आहेत. असे झाले तर सुनक यांचा १८ महिन्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. १४ वर्षांनी पुन्हा एकदा ब्रिटनला लेबर पार्टीचा पंतप्रधान मिळणार आहे.
स्टार्मर हे ब्रिटनमधील सर्वात मोठा विरोधी पक्ष लेबर पार्टीचे अध्यक्ष आहेत. पेशाने वकील असलेले स्टार्मर हे मुख्य अभियोक्ता राहिले आहेत. त्यांची संपूर्ण कारकीर्द गरजूंना न्याय देण्यासाठी खर्ची पडल्याचा दावा कामगार पक्षाने केला आहे. त्यांचे वडील एका कारखान्यात कारागीर म्हणून काम करत होते, तर आई नर्स होती.
YouGov ने केलेल्या सर्वेक्षणात लेबर पार्टी 17 गुणांच्या फरकाने आघाडीवर असल्याचे दिसत आहे. 37% लोकांनी लेबर पार्टीला पाठिंबा दिला आहे तर २० टक्के लोकांनी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाला पसंती दिली आहे. ब्रिटनमध्ये 392 पक्ष आहेत. तर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये लेबर पक्षाला 425 जागा मिळण्याचा अंदाज आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षाला केवळ 108 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. एकूण ६५० जागा असून बहुमतासाठी ३२६ जागा जिंकण्याची आवश्यकता आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत, कंझर्व्हेटिव्ह पक्षाने 43 टक्के मते मिळवत 365 जागा जिंकल्या होत्या.