लंडन - भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. त्यांना कंझर्वेटिव्ह पार्टीच्या सुमारे १८० खासदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यांच्याविरोधात लढणाऱ्या पेनी मोरडाँट यांना केवळ २६ खासदारांचा पाठिंबा मिळाला. पुरेसा पाठिंबा न मिळाल्याने पेनी यांनी आपली दावेदारी मागे घेतली. दरम्यान, पंतप्रधानपदाची शर्यत जिंकल्यानंतर ऋषी सुनक हे कंझर्वेटिव्ह पार्टीच्या मुख्य कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांनी लोकांशी संवाद साधला.
ऋषी सुनक म्हणाले की, कंझर्वेटिव्ह आणि युनुयनिस्ट पार्टीचा नेता म्हणून निवड झाल्याने मला सन्मानित झाल्यासारखं वाटत आहे. मी ज्या पार्टीवर प्रेम करतो तिची आणि देशाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे, हे माझं मी सौभाग्य समजतो.
लिज ट्रस यांनी देशाची जी सेवा केली आहे, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी अनेक बदलांदरम्यान, सेवा गरिमा राखून केली, असे ऋषी सुनक म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, मी ईमानदारी आणि विनम्रपणे ब्रिटनच्या जनतेची सेवा करेन आणि त्यांच्यासाठी दिवस-रात्र एक करून काम करेन. आपल्यासमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे, त्या माध्यमातून आम्ही आव्हानांवर मात करू शकतो आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी एक चांगलं भविष्य निर्माण करू शकतो.
ब्रिटन खूप मोठा देश आहे. तसेच सध्या ब्रिटन मोठ्या आर्थिक आव्हानांचा सामना करत आहे. ऋषी सुनक यांनी सांगितले की, ब्रिटनमध्ये आता स्थिरता आणि एकतेची गरज आहे.