युक्रेनवर युद्ध लादल्याने रशियाविरोधात नाटो देश एकवटले आहेत. यात प्रामुख्याने ब्रिटन आणि अमेरिका उघड उघड विरोध करत आहेत. रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. असे असताना दोन महिन्यांपूर्वीच ब्रिटनच्या पंतप्रधान झालेल्या लिझ ट्रस यांचा फोन रशियाने हॅक केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यामुळे ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांनादेखील रशियाकडून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
ट्रस या ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री असताना त्यांचा मोबाईल पुतीन यांच्यासाठी काम करणाऱ्या एजंटांनी हॅक केला होता. याबाबत आता माध्यमांमध्ये आले आहे. या रिपोर्टमध्ये ट्रस यांचे निकटचे मित्र क्वासी क्वार्टेंग यांच्यातील खासगी चॅटसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहकाऱ्यांसोबतच्या गुप्त चर्चा देखील रशियाने मिळविल्या होत्या.
लिज ट्रस तेव्हा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होत्या. त्यासाठी ब्रिटनमध्ये मोहिमा सुरु होत्या. त्या मोहिमेत ऋषी सुनक देखील उमेदवार होते. ब्रिटन युक्रेन युद्धावरून काय विचार करतोय, त्यांची काय चाल असेल हे पाहण्यासाठी ट्रस यांचा मोबाईल हॅक करण्यात आला होता. यातून रशियाच्या हाती अन्य देशांच्या परराष्ट्र मंत्री, नेत्यांसोबत काय काय चर्चा झाली त्याचा तपशील, चॅट लागले होते. यामध्ये युक्रेनला दिल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांबाबतही गुप्त गोष्टी उघड झाल्या होत्या. माजी पंतप्रधान जॉन्सन यांच्यावर टीका करणारे ट्रस आणि क्वार्टेंगचे मेसेजदेखील असल्याचा दावा करण्यात आला आहे. जवळपास १ वर्षांचे मेसेज यामध्ये आहेत.
ब्रिटिश सरकारच्या प्रवक्त्याने महनीय व्यक्तींच्या सुरक्षेवर काही बोलण्यास नकार दिला. सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी सरकारकडे मजबूत तंत्रज्ञान आहे. यामध्ये मंत्र्यांची नियमित सुरक्षा ब्रीफिंग, त्यांच्या वैयक्तिक डेटाचे संरक्षण समाविष्ट आहे, असे त्याने म्हटले.