लंडन : लठ्ठपणामुळे होणारे विकार व धोका याबद्दल आपण नेहमीच ऐकतो; पण डिमेन्शिया वा विस्मरणाच्या आजाराचा धोका लठ्ठपणामुळे कमी होऊ शकतो, असा खळबळजनक दावा ब्रिटिश शास्त्रज्ञांनी केला आहे. या निष्कर्षामुळे संशोधकही चक्रावून गेले आहेत. डिमेन्शिया हा विस्मरणाशी संबंधित आधुनिक आजार असून, त्यावर कोणताही उपचार नाही. विस्मरणाच्या या आजारात रुग्ण स्वत:ची ओळखही विसरत असल्याने, वृद्धत्वाच्या सीमारेषेवर असणाऱ्या लोकांचे कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त करून जातो. २०५० पर्यंत जागतिक पातळीवर या आजाराचे १३५ दशलक्ष लोक असतील असा अंदाज आहे. लंडन स्कूल आॅफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनच्या पथकाने ५५ च्या वयोगटातील १,९५८,१९१ लोकांच्या वैद्यकीय नोंदीचे विश्लेषण जवळपास २० वर्षे केले. या अभ्यासावरून असे लक्षात आले की, वजन कमी असणाऱ्या लोकांना डिमेन्शियाचा धोका ३९ टक्के अधिक असतो, तर ज्या लोकांचे वजन जास्त होते, म्हणजेच जे लोक लठ्ठ होते, त्यांच्या बाबतीत मात्र हा धोका १८ टक्क्यांपर्यंत खाली आला. हे एक आश्चर्यच आहे असे प्रमुख संशोधक डॉ. नवाब क्विझिलीबाश यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)४सडपातळ लोकांना डिमेन्शियाचा धोका अधिक आणि लठ्ठ व्यक्तींना मात्र या आजाराचा धोका कमी असा हा निष्कर्ष आहे. पण हा आधार घेऊन स्वत:चे वजन मात्र वाढवू नका, असा सल्ला नवाब क्विझिलीबाश यांनी दिला आहे. कारण हृदयविकाराचे झटके, मधुमेह, काही प्रकारचे कर्करोग व इतर अनेक रोग लठ्ठपणाशी निगडित असतात.
‘विस्मरणा’चा धोका लठ्ठपणाने होतो कमी
By admin | Published: April 13, 2015 11:51 PM