लाहोर - पाकिस्तानातील लाहोर किल्ल्यावर महाराजा रणजीत सिंह यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. आतापर्यंत तिसऱ्यांदा या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. पुतळ्याची विटंबना करणारा व्यक्ती हा तेहरिक-ए- लब्बैक पाकिस्तान या पाकिस्तानी पक्षाचा असल्याची माहिती असून त्यास अटक करण्यात आली आहे. पुतळ्याची तोडफोड करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर, लाहोर पोलिसांनी त्यास अटक केली आहे. त्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
महाराजांच्या पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या माथेफिरुचे नाव रिझवान असून तो तालिबानी सपोर्टर असल्याचे समजते. तसेच, पाकिस्तामधील तेहरिक-ए-लब्बैक पाकिस्तान या पक्षाचाही समर्थक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. व्हायरल व्हिडिओत एक व्यक्ती हाताने पुतळ्याची तोडफोड करताना दिसत आहे. तोडफोड करणाऱ्या व्यक्तीने पुतळ्याचे हात तोडले आणि नंतर पुतळा घोड्यावरून खाली पाडला.
महाराजा रणजीत सिंह यांच्या पुतळ्याजवळ विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. तेवढ्यात एका व्यक्तीने त्याला पकडून पुतळ्याची तोडफोड करण्यापासून थांबवलं. दरम्यान, यापूर्वीही दोनदा या पुतळ्याची तेहरिक-ए- लब्बैक पाकिस्तानच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद हुसैन यांनी देखील हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. "हा अतिशय लाजिरवाणा प्रकार असून हा निरक्षर लोकांचा समूह जगातील पाकिस्तानच्या प्रतिमेसाठी खरोखरच धोकादायक आहे" असं हुसैन यांनी म्हटलं आहे.
यापूर्वीही झाली होती पुतळ्याची विटंबना
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये देखील एका व्यक्तीने पुतळ्यावर हल्ला केला होता. पुतळ्याचा हात तोडला होता. तसेच आणखी नुकसान करण्याचा प्रयत्न केला होता. पण लोकांनी त्याला वेळीच पकडलं एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात मंदिराला निशाणा बनवण्यात आलं होतं. पंजाब प्रांतातील सादिकाबाद जिल्ह्यातील भोंग शरीफ गावात असलेल्या गणेश मंदिरात काही समाजकंटकांनी तोडफोड केली. या तोडफोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मंदिरामध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्य संशयितांसह 50 जणांना अटक करण्यात आली होती. तसेच 150 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर हिंदू समुदायामध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेत आरोपींच्या अटकेचे आदेश दिले होते.