काबुल : अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन जुळ्या इमारतींवर 11 सप्टेंबर 2001 मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या घटनेला आज 18 वर्षे पूर्ण झाली असून काबुलमध्ये अमेरिकी दुतावासासमोर बॉम्बस्फोट करण्यात आला आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही.
वृत्तसंस्था शिन्हुआने सांगितले की, हा एका रॉकेट हल्ला होता. मोठ्या आवाजानंतर तेथे धूर उठताना दिसत होता. तालिबानसोबत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सुरू असलेली चर्चा रद्द केली होती. यानंतर तालिबानने आता आणखी अमेरिकी मरणार असल्याची धमकी दिली होती. काबुलमध्ये ५ सप्टेंबरला कार बॉम्बस्फोटात एका अमेरिकी सैनिकासोबत 12 जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला होता.
याआधी अफगाणिस्तानच्या मैडन वर्दक प्रांतामध्ये अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये 7 नागरिकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला रविवारी करण्यात आला होता. अफगाणिस्तान सरकारकडे तेथील नागरिकांनी या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
9/11 हल्ल्यात 2983 जण मारले गेलेलेअमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन गगनचुंबी इमारतींमध्ये विमाने आदळवण्यात आली होती. यामध्ये 2983 लोक मारले गेले होते. या हल्ल्यामध्ये अल कायदा प्रमुख ओसामा बिन लादेनचा हात होता. अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला करून अल कायदाचे कंबरडे मोडले होते. ओसामा पाकिस्तानच्या एबोटाबादमध्ये पाकिस्तानी छावणीजवळ राहत होता. अमेरिकेने एका मोहिमेत 2011 मध्ये त्याला ठार केले होते.