काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथील भारतीय दूतावास अर्थात इंडिया हाउसमध्ये मंगळवारी रॉकेट कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. रॉकेट दूतावासाच्या आवारातील व्हॉलीबॉल मैदानात कोसळले. भारतीय राजदूतांच्या निवासस्थानाशिवाय दूतावासातील अन्य कर्मचारीही इंडिया हाऊसमध्ये राहतात. यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त अद्याप नाही, असे नवी दिल्लीतील सूत्रांनी सांगितले.सकाळी सव्वाअकरा वाजता ही घटना घडली. गेल्या आठवड्यातील घातक ट्रक बॉम्बहल्ल्याच्या दृष्टिकोनातून राजधानीतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलेली असताना ही घटना घडली. गेल्या आठवड्यातील हल्ल्यात १५० लोक ठार, तर इतर अनेक जखमी झाले होते. भारतीय दूतावासात रॉकेट कोसळले असतानाच राजधानीत सकाळी ‘काबुल प्रोसेस’ बैठक सुरू झाली. भारतासह २३ देशांचे प्रतिनिधी अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने या बैठकीत भाग घेत आहेत. (वृत्तसंस्था)>शांततेसाठी शेवटची संधी; गनी यांनी तालिबानींना सुनावलेट्रक बॉम्बहल्ल्यातील बळींची संख्या १५० वर गेल्याचे जाहीर केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी अफगाण शांतता परिषदेत तालिबानला मंगळवारी निर्वाणीचा इशारा दिला. तालिबानने शांततेच्या मार्गाने चालावे किंवा मग परिणाम भोगण्यास तयार राहावे, असे ते म्हणाले.हिंसाचार आणि हिंसक निदर्शनांमुळे गनी यांच्यावरील दबाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. अफगाणिस्तानवरील आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेनिमित्त राजधानीत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राजधानीच्या चौकाचौकात चिलखती वाहने तैनात असून, लढाऊ विमाने घिरट्या घालत आहेत. आम्ही शांततेला एक संधी देत आहोत; परंतु ही संधी तहहयात नाही. वेळ निघून चालली आहे. ही शेवटची संधी आहे. संधीचा लाभ घ्या किंवा मग परिणाम भोगण्यास तयार राहा, असे गनी तालिबानला उद्देशून म्हणाले.
भारतीय दूतावासात कोसळले रॉकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2017 12:19 AM