अंतराळ संशोधनातील आपल्या कामगिरीच्या निमित्ताने कायम चर्चेत राहणाऱ्या नासा (नॅशनल एअरॉनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन) संस्थेने तब्बल ३२२ फूट उंचीचे रॉकेट तयार केले आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याहून उंच असलेल्या या रॉकेटची अनेक वैशिष्ट्ये आहेत.
नासाचे मिशन अर्टेमिस
चंद्राच्या दक्षिण गोलार्धावर अंतराळवीराला तसेच चांद्रभूमीवर महिला अंतराळवीराला उतरवणे हे नासाचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टाला मिशन अर्टेमिस म्हटले जाते. या मोहिमेसाठी स्पेस लाँच सिस्टीम (एसएलएस रॉकेट) उभारण्याचे काम नासाने सुरू केले आहे.
तांत्रिक वैशिष्ट्ये
अपोलो मिशनच्या धर्तीवर एसएलएस रॉकेटची उभारणी करण्यात आली आहे. एसएलएसच्या तांत्रिक उभारणीत चार आरएस-२५ इंजिनांचा महत्त्वाचा वाटा आहे. सर्वात खाली असलेली ही इंजिने अवकाशात उड्डाण घेण्यासाठी बळ देणार आहेत. त्यापुढे रॉकेटचा मुख्य गाभा असलेला कोअर स्टेज आहे. कोअर स्टेजमध्ये द्रवरूप हायड्रोजन व ऑक्सिजन अतिशीत प्रमाणत उपलब्ध असून त्यांचे प्रमाण ७,३०,००० गॅलन आहे. कोअर स्टेजला दोन बूस्टर्स जोडण्यात आले आहेत. ते रॉकेटला उड्डाणासाठी अतिरिक्त शक्ती प्रदान करणार आहेत.
एसएलएसचे वैशिष्ट्य
अंतराळवीर, कार्गो आणि ओरियन अवकाशयान यांना एकाचवेळी चांद्रभूमीवर वाहून नेण्याची क्षमता या स्पेस लाँच सिस्टीममध्ये आहे. ओरियन अवकाशयानाला चांद्रभूमीवर पोहोचण्यासाठी २४,५०० मैल प्रतितास एवढी प्रचंड वेगशक्ती प्राप्त करून देण्याचे काम एसएलएस करणार आहे. रॉकेटच्या उभारणीसाठी सर्व अभियांत्रिकी कौशल्ये पणाला लावावी लागली.
उड्डाणानंतर काय
एसएलएसच्या उड्डाणासाठीची पूर्वतयारी काटेकोरपणे केली जात आहे. आरएस-२५ इंजिने, कोअर स्टेज, बूस्टर्स यांच्या जुळवाजुळवीनंतर पुढील टप्पा क्रायोजेनिक प्रॉपल्शनचा आहे. उड्डाणानंतर कोअर स्टेज रॉकेटपासून विलग झाल्यावर क्रायोजेनिक प्रॉपल्शन महत्त्वाची भूमिका बजावील. सुरुवातीच्या टप्प्यात लाँचपॅडवरून उड्डाण घेऊन रॉकेटला पृथ्वीच्या कक्षेबाहेर ढकलण्यासाठी कोअर स्टेज आणि रॉकेट बूस्टर्स कळीची भूमिका निभावतील.