ऑनलाइन लोकमत
लॉस एंजलिस (अमेरिका), दि. ११ - रॉकच्या विश्वात गायक, कवी व निर्मात्याच्या रुपात ४० वर्षे चमकणा-या डेव्हिड बोवी या कलाकाराचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले. कर्करोगाशी झंज देता देता बोवींची प्राणज्योत मालवली.
गेले १८ महिने कर्करोगाशी झुंज देत असलेल्या बोवींनी मित्रमंडळी व आप्तांच्या सानिध्यात सोमवारी अखेरचा श्वास घेतला.
ग्लॅम रॉक, आर्ट रॉक, सोल, हार्ड रॉक, डान्स पॉप, पंक आणि इलेक्ट्रॉनिकासारख्या विविध प्रकारांच्या माध्यमांतून बोवींनी पाश्चात्य संगीतरसिकांच्या मनावर राज्य केलं. गेल्याच आठवड्यात ८ जानेवारी रोजी वाढदिवशी बोवींनी आपला २५वा अल्बम ब्लॅकस्टार प्रसिद्ध केला.
१९७२च्या दी राइझ अँड फॉल ऑफ झिग्गी स्टारडस्ट आणि दी स्पायडर्स फ्रॉम मार्स या अल्बमपासून बोव्ही प्रसिद्धीझोतात आले. ब्रिटिश संगीतावर जपानी काबुकीचे संस्कार, तर रॉकची नाटकाशी सांगड असे अभिनव प्रकार रुजवणा-या बोवींना अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे.