मनिला- फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष रोड्रीगो ड्युएर्टे यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. बेछूट विधाने करणे, भाषणात शिव्यांचा वापर करायला मागेपुढे न पाहाणाऱ्या ड्युएर्टे यांनी यावेळी अधिकच गंभीर विधान केले आहे. महिला बंडखोरांच्या जननेंद्रियात गोळ्या झाडा असे आदेश ड्युएर्टे यांनी सैनिकांना दिले आहेत. हा वादग्रस्त फतवा त्यांनी एका भाषणात काढला असून हे भाषण त्यांच्या संवाद विभागाने प्रसिद्धही केले आहे.
ड्युएर्टे हे राष्ट्राध्यक्ष होण्यापुर्वी जावाओ शहराचे महापौर होते. ७ फेब्रुवारी रोजी ते राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान म्हणजेच मॅलाकॅनांग पॅलेसमधील हिरोज हॉलमध्ये पूर्वाश्रमीच्या कम्युनिस्ट गटासमोर त्यांनी हे भाषण केले आहे.
या भाषणात ते म्हणाले, '' महिला सैनिकांना सांगा, आता महापौरांनी नवे आदेश दिले आहेत. आम्ही तुम्हाला ठार मारणार नाही तर तुमच्या जननेंद्रियात गोळ्या झाडू, जर त्यांचे जननेंद्रियच राहिले नाही तर त्यांचा (महिलांचा) काहीच उपयोग राहाणार नाही. " ड्युएर्टे यांच्या विधानावरुन महिलांकडे जननेंद्रिय नसेल तर त्यांचा काहीच उपयोग नाही असा अर्थ ध्वनित होत असल्यामुळे त्यांच्यावर जगभरातून टीका होत आहे. ड्युएर्टे यांचे भाषण लिखित स्वरुपात प्रसिद्ध झाले आहे, त्यामध्ये 'जननेंद्रिय' या शब्दाच्या जागी रेष मारुन जागा मोकळी सोडली आहे. कम्युनिस्ट चळवळीमध्ये सामिल होण्यासाठी घरदार सोडणाऱ्या महिलांवरही त्यांनी टीका केली आहे.
राष्ट्राध्यक्षांचे बेताल वक्तव्य, सैनिकाने बलात्कार केल्यास जबाबदारी घेईनरोड्रीगो ड्युएर्टे यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्यं केली आहे. एखाद्या सैनिकांने तीन महिलांशी बलात्कार केल्यास त्याची जबाबदारी मी घेईन, असं वादग्रस्त आणि धक्कादायक विधान रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी केलं होतं. रोड्रीगो ड्युएर्टे यांना या बेताल वक्तव्यामुळे जगभरातून टीकेला सामोरं जाव लागलं होतं. ड्युटर्ट यांनी अप्रत्यक्षपणे सैनिकांना बलात्कार करण्यासाठी प्रोत्साहनच दिले अशी खंत महिला संघटनांनी व्यक्त केली होती.
सैन्यातील जवानांशी संवाद साधताना फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी हे वादग्रस्त विधान केले होते. सैन्याच्या जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी जवानांशी संवाद साधला. पण भाषणादरम्यान ड्युटर्ट यांची जीभ घसरली. जगभरातून टिका होत असल्याचे पाहून आपल्या वक्तव्याची सारवासारव केली. मिंडनाओमध्ये मार्शल लॉ लागू असताना सैनिकांनी अत्याचार केला तर त्याची जबाबदारी आपण घेऊ, असं आपल्याला म्हणायचं होतं, असं ड्युटर्ट म्हणाले होते.