स्टॉकहोम : भौतिकशास्त्रातील यंदाचा नोबेल पुरस्कार तीन शास्त्रज्ञांना घोषित करण्यात आला आहे. रॉजर पेनरॉस (ब्रिटन) यांना कृष्णविवराबाबत नवीन शोध लावल्याबद्दल, तर राईनहार्ड जेन्झेल (जर्मनी) आणि अँद्रिया गेज (अमेरिका) यांना आकाशगंगेच्या केंद्रातील सुपरमॅसिव्ह कॉम्पॅक्ट ऑब्जेक्ट शोधल्याबद्दल नोबेल पुरस्कार घोषित करण्यात आला, असे रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेस्ने म्हटले आहे.सुवर्णपदक आणि एक कोटी स्विडीश क्रोना (११ लाख अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक) असे या नोबेल पुरस्काराचे स्वरूप आहे. रोख बक्षिसापैकी निम्मी रक्कम रॉजर पेनरॉस यांना, तर उर्वरित रकमेचे मानकरी राईनहार्ड जेन्झेल अँद्रिया गेज असतील. अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्ताच्या आधारे गणितीय पद्धतीने पेनरॉस यांनी कृष्णविवराची निर्मिती शक्य असल्याचे सिद्ध केले. राईनहार्ड जेन्झेल अँद्रिया गेज यांनी आकाशगंगेच्या केंद्रातील सुपरमॅसिव्ह कॉम्पॅक्ट आॅब्जेक्ट शोधले आहेत. आकाशगंगेच्या केंद्राभोवतालच्या धुळीत काही तरी चमत्कारित हालचाली होतातआणि न दिसू शकणारे अनेकतारे फिरत असल्याचे जाणवले. ते कृष्णविवर होते. हे सूर्यापेक्षा ४ दशलक्षपटीने मोठे महाकाय कृष्णविवर आहे. (वृत्तसंस्था)
कृष्णविवर शोधणाऱ्या तीन शास्त्रज्ञांना नोबेल; भौतिकशास्त्रासाठीचा पुरस्कार घोषित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 5:41 AM