ढाका- म्यानमारमधील रखाइन प्रांतामध्ये झालेल्या हिंसाचाराला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. रोहिंग्यांनी या दिवसाला काळा दिवस जाहीर करुन गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. सुमारे 7 लाख रोहिंग्यांना आपले घरदार सोडून बांगलादेशातील निवारा शिबिरांमध्ये आश्रय घेतला आहे.रोहिंग्या दहशतवाद्यांनी रखाईनमध्ये गोंधळ घालायला सुरुवात केल्यावर म्यानमानच्या लष्कराने रोहिंग्यांविरोधात मोहीमच उघडली. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले तर कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले.रोहिंग्यांनी प्रार्थना, भाषणे आणि गाण्यांचे आयोजन करुन काळा दिवस पाळला आहे. रोहिंग्यांच्या इतक्या मोठ्या संख्येमुळे बांगलादेशातील कॉक्स बझारमधील छावणीतील व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. बांगलादेशातील या रोहिंग्यांच्या स्थितीबद्दल ह्युमन राइटस वॉच संस्थेने 68 पानांचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. पावसाळ्यामध्ये पूर तसेच दरड कोसळण्याचा या रोहिंग्यांना मोठा धोका आहे तसेच संसर्गजन्य रोग, आग, सामूहिक तणाव, घरगुती व लैंगिक छळ अशी संकटे येथे उभी असल्याची माहिती ह्युमन राइटस वॉचने दिली आहेत. रोहिंग्याला भक्कम आश्रयस्थान, शिक्षणाची सोय दिली पाहिजे असेही या अहवालात म्हटले आहे. बांगलादेश इज नॉट माय कंट्री- द प्लाइट ऑफ रेफ्युजीस फ्रॉम म्यानमार असे या अहवालाचे नाव आहे. या लोकांना उखिया येथील मोठ्या छावणीत पाठवावे अशी सूचना त्यात करण्यात आली आहे.गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून 7 लाख रोहिंग्यांनी म्यानमारच्या रखाईन प्रांतातून स्थलातंर केले आहे आणि त्यांनी बांगलदेशात प्रवेश केला आहे. कुतापलाँग-बालुखाली या छावणीमध्ये 6 लाख 26 हजार लोक राहात असून जगातील सर्वात मोठी छावणी म्हणून ती ओळखली जात आहे. येथे अत्यंत कमी जागेत जास्त लोक सामावले असून प्रत्येक व्यक्तीला 10.7 चौ. मी इतकी जागा राहाण्यासाठी मिळत आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी किमा 45 चौ. मी जागा उपलब्ध असली पाहिजे. यातील 2 लाख रोहिंग्यांना पूर आणि दरडींचा त्रास सहन करावा लागू शकतो.
रोहिंग्यांनी पाळला काळा दिवस; म्यानमारमधील हिंसाचाराला एक वर्ष पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 2:34 PM