ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या परदेश दौ-यामध्ये नेहमीच त्या देशात स्थायिक झालेल्या भारतीयांशी संवाद साधतात. तिथल्या गुजराती समाजाकडूनही त्यांचे भव्य स्वागत केले जाते. शनिवारी पोर्तुगालमध्ये दाखल झाल्यानंतरही मोदींचे तिथल्या गुजराती समाजाने असेच भव्य स्वागत केले.
पोर्तुगाल हा तसा युरोपमधला छोटासा देश पण मोदींची ही पोर्तुगाल भेट किती महत्वाची होती हे समजून घेणे महत्वाचे आहे. इंग्लंड, अमेरिकेप्रमाणे पोर्तुगालमध्येही गुजराती समाज मोठया प्रमाणावर आहे. इथे स्थायिक झालेल्या गुजराती समाजाचे मूळ भारतात आहे. फार कमी गुजराती भारतातून थेट पोर्तुगालमध्ये येऊन स्थायिक झाले आहेत. इथे स्थायिक असलेले बहुतांश गुजराती हे मोझमबिक, मकाऊ आणि केनिया इथून वसाहतवादाच्या मार्गाने पोर्तुगालमध्ये आले.
इथे राहणारे गुजराती हुशार, चतुर व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. पोर्तुगालमध्ये राहणा-या भारतीयांनी इथल्या संस्कृशी जुळवून घेतले असून, ते इथल्या सामाजिक, सांस्कृतिक उत्सवांमध्येही मोठया प्रमाणावर सक्रीय आहेत. इथे राहणारे 90 टक्के भारतीय आज पोर्तुगीज भाषा बोलतात. पोर्तुगालमध्ये भारतीय वंशाचे जवळपास 70 हजार लोक राहत असून ते महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत.
मागच्या काहीवर्षांपासून पोर्तुगाल सरकार भारताबरोबर व्यापारी संबंध बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये तिथे राहणारे भारतीय महत्वाची भूमिका बजावत आहेत. मोदी लिस्बनमध्ये दाखल झाल्यानंतर पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यांच्यासाठी खास गुजराती भोजनाची व्यवस्था केली होती. यावरुन पोर्तुगालसाठी भारत किती महत्वाचा आहे हे समजून घेतले पाहिजे.