बॉस्टन- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रेनॉल्ड रेगन यांनी आपल्या मुलीला लिहिलेल्या एका पत्राचा लिलाव करण्यात येणार आहे. या पत्राला 20 हजार डॉलर्स किंमत मिळू शकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. रेगन यांनी आपल्यापासून वेगळ्या राहाणाऱ्या मुलीला हे अत्यंत भावनिक पत्र लिहिले होते. त्यांच्या कौटुंबिक आणि भावनिक जीवनात सुरु असलेली आंदोलनं या पत्रामुळे सर्व समाजाच्या समोर येतात.
रोनाल्ड आणि नॅन्सी या दाम्पत्याचं पहिलं अपत्य म्हणजे पॅटी डेव्हीस. राजकीय चळवळीत प्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या आणि आपल्याच वडिलांच्या राजकीय भूमिकेला विरोध करणाऱ्या पॅटी आणि रेगन दाम्पत्य यांच्यामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आणि ते वेगवेगळे राहू लागले. आपल्यापासून लांब राहाणाऱ्या, कुटुंबाशी संबंध तोडून राहाणाऱ्या पॅटीला 24 डिसेंबर 1989 रोजी रेगन यांनी पत्र लिहिले होते. या पत्रावर त्यांनी 'लव डॅड' असे लिहून स्वाक्षरीही केली आहे. या पत्रात ते म्हणतात, ''येत्या 6 फेब्रुवारी रोजी मी 80 वर्षांचा होणार आहे. आमचं पहिलंच अपत्य असं आमच्यापासून का वेगळं राहात आहे याचा उलगडा तुझी आई आणि मला अजूनही झालेला नाही. तुला शाळेत सोडून येताना तुझ्या आईच्या डोळ्यांमध्ये पाणी आलेलं मी पाहिलं आहे. आता गुडबाय असं न म्हणताही तू का सोडून गेलीस हे तिच्या अजूनही लक्षात आलेलं नाही. आम्ही बाहेर पडताना खिडकीतून गुडबाय केल्याशिवाय तू आम्हाला जाऊच द्यायची नाहीस, हे सगळं मला आजही आठवतं. आपलं नक्की काय चुकलं हा प्रश्न आम्ही स्वतःलाच विचारतो. आपलं एकेकाळी एकदम प्रेमळ कुटुंब होतं. मला अजूनही तू माझ्या मांडीवर बसलेली आणि माझ्याशी लग्न कर म्हणणारी मुलगी आठवते.''अशा एकदम भावनिक शब्दांमध्ये रेगन यांनी हे पत्र लिहिले आहे. मोठ्या पदावरती काम करणाऱ्या लोकांच्या खासगी, कौटुंबिक आयुष्यात होत असलेल्या घडामोडी प्रत्येक वेळेस लोकांच्या समोर येतीलच असे नाही. सामाजिक प्रतिमा आणि प्रतिष्ठा जपत या लोकांना जगावे लागते. पण रेगन यांच्या पत्रामधून एका महासत्तेच्या ताकदवान नेत्यामधील मृदुस्वभावी पिता दिसून आला आहे.