लंडन - ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेगन मार्कल यांचा शाही विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला आहे. विंडसर कॅसलमधील सेंट जॉर्ज चॅपलमध्ये 600 खास पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला आहे. विन्डसर कॅसलमध्ये विवाहबद्ध होणारं हॅरी-मेघान हे राजघराण्यातलं सोळावं जोडपं ठरले आहे. या शाही विवाह सोहळ्यावर सुमारे 293 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
प्रकृती ठीक नसल्यामुळे मेगन मर्केलचे वडील लग्नसोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत. दरम्यान, या शाही विवाह सोहळ्याला विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. हॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानंही या लग्नाला हजेरी लावली.
प्रिन्स हॅरी- मेगनबाबतच्या काही खास गोष्टी
- प्रिन्स हॅरी हा इंग्लडची राणी एलिझाबेथ द्वितीयचा नातू आणि वेल्सचे राजकुमार चार्ल्स आणि डायना यांचा लहान मुलगा आहे
- काही महिन्यांपूर्वी प्रिन्स हॅरीने मेगनला लग्नासाठी प्रपोज केलं होतं
- मेगनचं हे दुसरं लग्न आहे. 2013 मध्ये तिने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला
- या लग्नात सर्वात जास्त खर्च सुरक्षेवर करण्यात आलाय. हा खर्च सरकारी तिजोरीतून केला जाणार आहे
- मेगन मार्कलच्या ड्रेसची किंमत 90 लाख 80 हजार इतकी आहे
- या लग्नात 600 लोकांना निमंत्रित करण्यात आलंय. वेडिंग रिंग वेल्सच्या खाणीतून काढण्यात आलेल्या सोन्यापासून तयार करण्यात आलीये