युक्रेन युद्धाच्या काळात रशियाने एका शक्तीशाली मिसाईलची यशस्वी चाचणी केली आहे. यामुळे अमेरिकेसह जगभरात खळबळ उडाली आहे. रशियाने आरएस-28 सरमत मिसाईलची चाचणी घेतली आहे. हे असे मिसाईल आहे जे आपल्यासोबत हजारो किमींवर १० टन एवढी स्फोटके वाहून नेऊ शकते. ही अण्वस्त्रेदेखील असू शकतात.
या मिसाईलची रेंजच १८ हजार किमी आहे. या मिसाईलच्या चाचणीनंतर पुतीन यांनी आम्हाला धमकी देणाऱ्या देशांनी यापुढे दोनदा विचार करावा, असा इशारा दिला आहे. पुतिन म्हणाले की, सरमत आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. हे खरोखरच एक अद्वितीय शस्त्र आहे, जे आपल्या सशस्त्र दलांची लढाऊ क्षमता मजबूत करेल. आता आपल्या देशाला धमक्या देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी दोनदा विचार केला पाहिजे.
RS-28 हे सरमत सुपरहेवी इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. क्षेपणास्त्राची निर्मिती रशियन कंपनी मेकेयेव रॉकेट डिझाईन ब्युरोने केली आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी आणि निर्मिती २००९ पासूनच सुरु होती. मात्र, ते रशियन फौजांच्या सेवेत आणण्यात आले नव्हते. अमेरिकेने काही दिवसांपूर्वी अशाच एका क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. यानंतर रशियानेही ही चाचणी घेत अमेरिकेला प्रत्यूत्तर दिले आहे. या क्षेपणास्त्राचे महत्वाचे वैशिष्ट म्हणजे ते एकाचवेळी किंवा दोन टप्प्यांत १० ते १५ लक्ष्यांना भेदू शकते. या मिसाईलवर १० ते १५ वॉरहेड लादता येतात.
वेग एवढा की...हे मिसाईल एवढ्या प्रचंड वेगाने झेपावते की तासाला ते 25560 किमीचे अंतर पार करू शकते. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे हे मिसाईल एस-400 सारख्या मिसाईल लाँचरमधून लाँच केले जाऊ शकते. एस-400 ही डिफेन्स सिस्टिम आहे जी भारतालाही मिळाली आहे. या मिसाईलचे उद्घाटन 1 मार्च 2018 ला पुतीन यांनी केले होते.