Russ cook hardest Geezer marathon in Africa: मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण हा भारतातील एक फिट आणि तंदुरुस्त व्यक्ती म्हणून ओळखला जातो. पण तुम्ही 'हार्डेस्ट गीझर'बद्दल ऐकले आहे का? द हार्डेस्ट गीझर हा मॅरेथॉन धावपटू आहे जो रस कुक म्हणून ओळखला जातो. त्याने धावत पूर्ण दक्षिण आफ्रिका पार केली असून असा पराक्रम करणारा तो पहिलाच व्यक्ती आहे. या काळात त्याने चॅरिटीसाठी मोठी रक्कम जमा केली. ब्रिटनच्या 27 वर्षीय रस कुकने धावत जवळपास 16 देशांचा प्रवास केला. यादरम्यान त्याने 16 हजार किलोमीटरचा प्रवास केला. 7 एप्रिलला त्याची यात्रा पूर्ण झाली. मॅरेथॉनच्या शेवटच्या दिवशी त्यांचे अनेक समर्थकांनी स्वागत केले. कुकने एप्रिल 2023 मध्ये आफ्रिकेच्या दक्षिणेतील एल अगुल्हास गावातून आपला प्रवास सुरू केला, जो त्याने ट्युनिशियामध्ये पूर्ण केला. कुकने 352 दिवसांत हे 16 देश पार केले. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना कुकला बंदुकीच्या धाकावर लुटण्यात आले तसेच त्याला अन्नातून विषबाधाही झाली. पण या सर्व गोष्टींवर मात करत त्याने आपला निश्चय पूर्ण केला.
चॅरिटीच्या माध्यमातून जमवले 6 कोटी 31 लाख
कुकने मॅरेथॉनच्या माध्यमातून 6 कोटी 31 लाख रुपयांपेक्षा जास्त चॅरिटी मनी जमा केली आहे. या प्रवासादरम्यान कुक नामिबिया, अंगोला, काँगो लोकशाही प्रजासत्ताक, कॅमेरून, नायजेरिया, बेनिन, टोगो, घाना, आयव्हरी कोस्ट, गिनी, सेनेगल, मॉरिटानिया आणि अल्जेरिया या देशांतून गेला. आपली शर्यत पूर्ण केल्यानंतर, कुकने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली कामगिरी पोस्ट केली आणि सांगितले की संपूर्ण आफ्रिका धावत पूर्ण करण्याचे त्याचे मिशन पूर्ण झाले आणि असे करणारा तो पहिलाच आहे.
कुकचे समर्थक विविध देशांतून आले होते
कुकने गिव्ह स्टार नावाच्या चॅरिटी प्लॅटफॉर्मवरून दोन वेगवेगळ्या धर्मादाय संस्थांसाठी हे सर्व पैसे गोळा केले आहेत. गिव्ह स्टार चॅरिटी प्लॅटफॉर्मचे सायमन क्लिमा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'हार्डेस्ट गीझर'चा खरा अर्थ स्वतःला आव्हान देणे आणि काहीतरी अविश्वसनीय करणे हा आहे. टार्गेट पूर्ण करण्याआधी कुकने शेवटच्या दिवशी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संदेश पाठवून लोकांना आमंत्रित केले होते, त्यानंतर मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते, अनेक लोक इतर देशांतूनही कुकला पाठिंबा देण्यासाठी आले होते. धावत असताना सर्वजण त्याला प्रोत्साहन देत होते. त्याची ही कामगिरी अविश्वनीय आहे.