व्लादिमीर पुतिन पुन्हा एकदा रशियाचे राष्ट्रपती होऊ शकतात. आगामी 2024 मध्ये रशियात राष्ट्रपतीपदासाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत पुतिन यांना आव्हान देण्यासाठी कुणीही नसल्याचा दावा क्रेमलिनने केला आहे. यासंदर्भात बोलताना क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले, सध्या राष्ट्रपती पुतीन यांनी आपली उमेदवारी जाहीर केलेली नाही. मात्र ते निवडणुकीच्या मैदानात उतरले, तर त्यांना आव्हान देणारे कुणीही नाही. सध्या देशातील जनता पूर्णपणे राष्ट्रपती पुतीन यांच्या पाठीशी असल्याचा दावाही पेस्कोव्ह यांनी केला आहे.
20 वर्षांचा शासन काळ - व्लादिमीर पुतीन यांच्यासंदर्भात बोलायचे झाल्यास, ते एक माजी केजीबी एजन्ट होते. पुतिन हे गेल्या दोन दशकांपासून, कधी पंतप्रधान तर कधी राष्ट्रपती म्हणून राष्ट्राध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसलेले आहेत. गेल्या वर्षी रशियाने युक्रेनवर हल्ल्या केला. मात्र, हा हल्ला पुतीन यांच्या योजनांनुसार राहिला नाही. आपण युक्रेनवर सहज विजय मिळवू, असे त्यांना वाटत होते. पण रशियाला अनेक आघाड्यांवर आव्हानांना सामोरे जावे लागले आहे.
याशिवाय, पुतिन यांना वॅगनर ग्रुपच्या विद्रोहाचाही सामना करावा लागला आहे. महत्वाचे म्हणजे, युक्रेनवरील हल्ल्यानंतर, पाश्चिमात्य देशांनी रशियासंदर्भात अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. याशिवाय पाश्चिमात्य देशांनी रशियावर 2.1 ट्रिलियन डॉलरचे आर्थिक निर्बंधही लादले आहेत.
ओपिनियन पोल्समध्येही पुतिन आघाडीवर -पुतिन यांच्या लोकप्रियतेसंदर्भात बोलायचे झाल्यास, रशियामध्ये नुकत्याच झालेल्या ओपिनियन पोल्समध्ये, पुतीन रशियातील सर्वात लोकप्रिय नेते असल्याचे म्हटले आहे. लेवाडा सेंटरनुसार, ऑगस्ट महिन्यात पुतिन यांचे अप्रूव्हल रेटिंग 80 टक्के एवढे होते. जे युक्रेन युद्धापूर्वीपेक्षाही चांगले होते. युक्रेनवरील हल्ल्यासंदर्भातत रशियातील सुमारे 70 टक्के लोकांनी देशाला समर्थन दिले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला, अशा प्रकारच्या पोलवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, असे विरोधी पक्षांचे नेते आणि पाश्चात्य राजनयिकांचे म्हणणे आहे.